डिझेल बचतीत गणेशपेठ आगार राज्यात दुसरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:17+5:302021-01-25T04:08:17+5:30
‘बेस्ट डेपो’साठी निवड : वर्षभरात वाचविले ८७ हजार लिटर डिझेल नागपूर : पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ आणि इंडियन ऑईल ...
‘बेस्ट डेपो’साठी निवड : वर्षभरात वाचविले ८७ हजार लिटर डिझेल
नागपूर : पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ आणि इंडियन ऑईल काॅर्पोरेशनने सर्वाधिक डिझेल बचत करण्यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील गणेशपेठ आगाराला दुसरा क्रमांक दिला आहे. गणेशपेठ आगाराने २०१९-२० या वर्षात सर्वाधिक ८७ हजार लिटर डिझेलची बचत केली आहे.
एसटी महामंडळाच्या वतीने डिझेल बचत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात डिझेल बचतीसाठी चालकांचे प्रबोधन करणे, डिझेल बचत सप्ताह साजरा करणे, डिझेलची गळती होणार नाही याची काळजी घेणे, टायरमधील हवेचा दाब योग्य आहे की नाही हे वेळोवेळी तपासणे आणि एसटी बसची स्पीड नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. डिझेलची बचत करणाऱ्या डेपोंना पुरस्कार देण्याची घोषणा पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ आणि इंडियन ऑईल काॅर्पोरेशनने केली होती. त्यानुसार पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यात पहिला क्रमांक सोलापूर आगार, दुसरा क्रमांक गणेशपेठ आगार आणि तिसरा क्रमांक औरंगाबाद आगाराला देण्यात आला आहे. गणेशपेठ आगाराने सन २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० या वर्षात तब्बल ८७ हजार लिटर डिझेलची बचत केली. त्यामुळे आगाराचा राज्यात दुसरा क्रमांक लागल्याचे एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी गणेशपेठ आगाराला कळविले आहे. लवकरच एका समारंभात गणेशपेठ आगाराला पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात येणार आहे.
डिझेल बचतीसाठी काळजी घेऊ
डिझेल बचत करण्यासाठी गणेशपेठ आगारात विविध उपक्रम राबविण्यात येतात. वेळोवेळी चालकांना डिझेल बचत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. ८७ हजार लिटर डिझेल बचत केल्यामुळे आगाराचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. भविष्यातही डिझेल बचतीसाठी प्रयत्न करण्यात येतील.
-अनिल आमनेरकर, व्यवस्थापक, गणेशपेठ आगार
..........