गणेशपेठ पोलिसाने युवकाला गंभीर जखमी केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:48+5:302021-05-10T04:08:48+5:30
नागपूर : भालदारपुरा येथील बिछायत केंद्राच्या गोदामात झोपायला जात असताना एका युवकाला गणेशपेठ पोलिसाने बेदम मारहाण केली़ त्यामुळे ...
नागपूर : भालदारपुरा येथील बिछायत केंद्राच्या गोदामात झोपायला जात असताना एका युवकाला गणेशपेठ पोलिसाने बेदम मारहाण केली़ त्यामुळे युवक गंभीर जखमी झाला़ ही घटना शनिवारी रात्री घडली़ या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे़
नौशाद शेख असे पीडित युवकाचे नाव आहे़ सूत्रांच्या माहितीनुसार, बिछायत केंद्रासाठी काम करणाऱ्या नौशादने आर्थिक तंगीमुळे भाड्याचे घर सोडले आहे़ सध्या तो बिछायत केंद्राच्या गोदामात राहतो़ शनिवारी रात्री तो गोदामात झोपायला जात होता़ दरम्यान, पोलीस शिपाई अक्षय बारे यांनी त्याला थांबवून काठीने जबर मारहाण केली़ नौशादचा ओरडण्याचा आवाज ऐकूण परिसरातील नागरिक गोळा झाले़ त्यांनी नौशादला आधी गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेले़ त्यानंतर मेयो रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले़ नौशादच्या हाताला चार टाके लागले आहेत़ डॉक्टरांनी त्याला चार दिवसांनंतर शस्त्रक्रियेसाठी बोलावले आहे़
गणेशपेठ पोलीस संबंधित पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करीत आहेत. नागरिकांचा दबाव वाढल्यानंतर रविवारी तक्रार स्वीकारण्यात आली; पण गुन्हा नोंदवण्यात आला नाही़ पोलीस उपचाराचे पैसे देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे वसीम खान यांनी केला आहे़