नागपुरात खंडणीसाठी विद्यार्थ्यांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 01:15 AM2018-10-18T01:15:41+5:302018-10-18T01:16:50+5:30

सक्करदरा पोलिसांनी खंडणीसाठी विद्यार्थ्यांचे अपहरण करणाऱ्या आणि मनमानी रक्कम वसूल केल्यानंतर त्यांना सोडून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

The gang of abducting students for the ransom was exposed in Nagpur | नागपुरात खंडणीसाठी विद्यार्थ्यांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नागपुरात खंडणीसाठी विद्यार्थ्यांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Next
ठळक मुद्देतिघांना अटक : युवकाच्या अपहरणानंतर १५ दिवसांनी झाला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सक्करदरा पोलिसांनी खंडणीसाठी विद्यार्थ्यांचे अपहरण करणाऱ्या आणि मनमानी रक्कम वसूल केल्यानंतर त्यांना सोडून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी टोळीतील मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे.
२६ सप्टेंबरला आरोपींनी खंडणीसाठी अयोध्यानगर येथील रहिवासी हिमांशु सुनील कातरे याचे अपहरण केले होते. इतर कुटुंबाप्रमाणे हिमांशुच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली नाही. दोन दिवसांपूर्वी हिंमत करून पीडित कुटुंबीयांनी सक्करदरा पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे प्रकरणाचा खुलासा झाला. मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबीयांपासून लपून धूम्रपान करणाऱ्या किंवा इतर व्यसन करणारे शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थी या टोळीचे लक्ष्य असतात. या विद्यार्थ्यांना जबरदस्तीने उचलून टोळीच्या सूत्रधाराच्या घरी नेण्यात येते. तेथे मारहाण करून अवैध वसुली करण्यात येते. त्यानंतर कुटुंबीयांना खंडणी मागण्यात येते. आजपर्यंत अनेक विद्यार्थी या टोळीचे शिकार झालेले आहेत. परंतु भीतीपोटी कुणीच या टोळीविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत दाखविली नसल्याने या टोळीतील सदस्यांचे चांगलेच फावत होते. २६ सप्टेंबरला सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशीर्वादनगर, एनआयटी कॉम्प्लेक्स येथील एका पानठेल्यावर गेलेल्या हिमांशुला आरोपी प्रज्ज्वल मधुकर पिंपरे, फैजान यांनी जबरदस्तीने गाडीत बसवून टोळीचा सूत्रधार बिट्टु मिर्झा अजीज बेग रा. मिनार मस्जिद, मोठा ताजबाग याच्या घरी नेले. तेथे छतावर नेऊन आरोपी गौरवने हिमांशुला मारहाण केली. त्याच्या खिशातील पैसे काढले होते.

वडिलांना फोटो पाठवून मागत होते खंडणी
आरोपींनी हिमांशुला अधिक पैशांची मागणी करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. हिमांशुचे फोटो त्याच्या वडिलांना पाठवून खंडणी मागितली. हिमांशुने रक्कम आणून देण्याचे आश्वासन दिले. तेथून तो पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर हिमांशु आणि त्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर सक्करदरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३९२, ३६३, ३८४, ३४ नुसार गुन्हा दाखल करून टोळीचा सूत्रधार बिट्टु, प्रज्ज्वल आणि फैजानला अटक केली. टोळीतील इतर सदस्य अद्यापही फरार आहेत.

 

Web Title: The gang of abducting students for the ransom was exposed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.