‘प्रधानमंत्री आवास’साठी दलालांची टोळी; पीडितांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:16 AM2019-08-21T11:16:37+5:302019-08-21T11:17:06+5:30

नागपूर महानगर विकास प्राधिकरण व नासुप्र यांच्या संयुक्त विद्यमाने नैवेद्यम सभागृहात रविवारी आयोजित कार्यक्रमात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील घरकुलांची सोडत काढण्यात आली अन् कार्यक्रमानंतर दलालांची टोळीच्या बिंग फुटले.

Gang of brokers for 'prime minister accommodation'; Sensation in the victims | ‘प्रधानमंत्री आवास’साठी दलालांची टोळी; पीडितांमध्ये खळबळ

‘प्रधानमंत्री आवास’साठी दलालांची टोळी; पीडितांमध्ये खळबळ

Next
ठळक मुद्देअनेकांकडून उकळली हजारोंची रक्कम सोडतीनंतर फुटले दलालांचे बिंग

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पात घरकुल मिळवून देतो, अशी थाप मारून एका टोळीने घरकुल मिळवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेकांची फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. नागपूर महानगर विकास प्राधिकरण व नासुप्र यांच्या संयुक्त विद्यमाने नैवेद्यम सभागृहात रविवारी आयोजित कार्यक्रमात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील घरकुलांची सोडत काढण्यात आली अन् कार्यक्रमानंतर या टोळीचे बिंग फुटले. त्यामुळे या टोळीने ज्यांच्याकडून रक्कम उकळली त्यांना आता उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले आहे.
कुणीही झोपड्यात राहू नये, सर्वांना चांगली घरे मिळावी या हेतूने केंद्र सरकारने ठिकठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना राबविली. योजनेच्या प्रारंभी इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. घरकुलांच्या अर्जासाठी सुरुवातीला १०,५६० रुपये शुल्क आकारले गेले होते. गरीब लोक ांना ही रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे एक हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले. १०,१५६ लोकांनी अर्ज नेले. यातील ८,४८१ लोकांनी अर्ज भरले. त्यापैकी ७,३५४ अर्जदार लाभार्थी (पात्र) ठरले. त्यांच्यासाठी वाठोडा, तरोडी, वांजरी यासारख्या पाच ठिकाणी सर्वसुविधांयुक्त घरे बांधण्यात आली. पहिल्या टप्प्यात ४,३४५ घरकुलांचे वाटप करण्याचे निश्चित झाले. या घराची मालकी देण्यासाठी अत्यंत पारदर्शी पद्धतीचा वापर करण्यात आला. रविवारी, ११ आॅगस्टला आॅनलाईन लॉटरी (सोडत) काढण्यात आली. सरकार आणि या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची नोडल एजंसी म्हणून काम करणारे एनआयटी प्रशासनातील उच्चपदस्थ पारदर्शीपणे काम करीत असताना काही भ्रष्ट प्रवृत्तीने या प्रकल्प प्रक्रियेत शिरकाव केला. त्यांनी अर्जदारांची कुठून आणि कशी यादी मिळवली कळायला मार्ग नाही. त्यांनी काही जणांना संपर्क करून तुम्हाला जेथे पाहिजे त्या ठिकाणी (तळमाळा, पहिला माळा, दुसरा माळा) घरकुल मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यासाठी ३० हजार रुपये भरावे लागतील, असे या भामटे सांगू लागले. आपण एनआयटीतून बोलतो, असेही हे भामटे सांगत होते.
अर्जाच्या फोटो कॉपी व्हॉटस्अ‍ॅपवर
विशेष म्हणजे, हे भामटे ज्यांनी घरकुलासाठी अर्ज केला होता त्याला त्यांच्या अर्जाच्या फोटो कॉपी व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवू लागले. त्यामुळे अनेकांचा त्यावर विश्वास बसला. मे महिन्यांपासून सक्रिय झालेल्या या टोळीच्या थापेबाजीला अनेकजण बळी पडले. एनआयटीतूनच सर्व होणार असल्याची माहिती असल्याने आणि एनआयटीतून बोलतो, असे या टोळीतील भामटे सांगत असल्याने अनेकांनी मनासारखे घरकुल मिळावे म्हणून या टोळीतील भामट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात रक्कम जमा केली. दरम्यान, आपल्याला आता जेव्हा केव्हा सोडत होईल तेव्हा मनासारखे घर मिळेल, असे मनोमन स्वप्न रंगविणाऱ्यांचा रविवारी झालेल्या सोडतीच्या कार्यक्रमानंतर स्वप्नभंग झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पीडितांनी या टोळीतील भामट्यांना आपली रक्कम परत मागणे सुरू केले. काहींना अर्धवट रक्कम देऊन आरोपींनी आता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले आहे.

Web Title: Gang of brokers for 'prime minister accommodation'; Sensation in the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.