केवळ ‘इलेक्ट्रीक वायर’च ‘टार्गेट’ करणाऱ्या टोळीचा भंडाफोड, पाच गुन्हे उघड
By योगेश पांडे | Published: July 4, 2023 05:22 PM2023-07-04T17:22:27+5:302023-07-04T17:23:05+5:30
१.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : शहरातील विविध भागांमधून केवळ ‘इलेक्ट्रीक वायर’च चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी भंडाफोड केला असून एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान त्यांनी केलेले पाच गुन्हे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
७ जून रोजी महाल येथील अश्विन दक्षिणी यांच्या लकडगंज येथील निर्माणाधीन घरातून ८० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रीक वायर चोरी गेली होती. या प्रकरणाचा गुन्हे शाखेकडूनदेखील समांतर तपास सुरू होता. सीसीटीव्ही कॅमेरे व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना यात योगेश उर्फ लक्की रमेश शाहू (२५, कोतवाली, काशीबाई देवळाजवळ) याचा हात असल्याचे कळाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने कबुली दिली. संतोष शाहू (३८, न्यू बिनाकी, मंगळवारी, कांजी हाऊस चौक) याच्यासोबत मिळून हे गुन्हे केल्याचे त्याने सांगितले.
योगेशला अटक करून त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १०० बंडल, अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८, नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २० बंडल, प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २४ बंडल चोरल्याची कबुली दिली. आरोपी वायरमधून तांबे गळविण्याची प्रक्रिया करून त्याची विक्री करायचे. पोलिसांनी त्याच्याकडून तशाप्रकारचे १०८ किलो तांबे, दुचाकी, मोबाईल असा १.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना लकडगंज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. संतोष शाहू फरार असून त्याचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश सागडे, कोरडे, अनिल जैन, मुकेश राऊत, प्रवीण लांडे, अनुप तायवाडे, अमोल जासुद, संतोष चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.