नागपुरात नोकरीच्या नावावर फसवणूक करणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 10:38 PM2018-09-06T22:38:51+5:302018-09-06T22:42:07+5:30

नोकरीचे आमिष दाखवून तरुण बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना फसवणाऱ्या अनेक टोळ्या शहरात सक्रिय आहेत. असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या टोळीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपले शिकार बनवले. फसवल्या गेलेल्या पीडित मुलांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला आहे. धंतोली पोलीस याचा शोध घेत आहे.

Gang of cheater in the name of job active in Nagpur | नागपुरात नोकरीच्या नावावर फसवणूक करणारी टोळी सक्रिय

नागपुरात नोकरीच्या नावावर फसवणूक करणारी टोळी सक्रिय

Next
ठळक मुद्देप्रशिक्षणाच्या नावावर ओढतात जाळ्यात : अनेक बेरोजगार युवक-युवतींना फसवले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून तरुण बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना फसवणाऱ्या अनेक टोळ्या शहरात सक्रिय आहेत. असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या टोळीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपले शिकार बनवले. फसवल्या गेलेल्या पीडित मुलांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला आहे. धंतोली पोलीस याचा शोध घेत आहे.
पीडित मुलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आशिष डोंगरे असे नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलवरून जाहिरात दिली. यात प्रशिक्षण देऊन नागपुरातील विविध नामांकित कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ३० मे २०१८ रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन मधुरम हॉल झांशी राणी चौक सीताबर्डी येथे बोलावले. या ठिकाणी अनेक बेरोजगार युवक-युवती आले. आपण दरमहा १५ ते २५ हजार रुपयाची नोकरी लावून देतो, असे सांगितले, परंतु त्यासाठी महिनाभराचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ६,८०० रुपये भरण्यास सांगितले. नोकरी मिळेल या अपेक्षेने अनेकांनी पैसे भरले. पैसे घेतल्यानंतर बर्डी येथीलच एका प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणासाठी बोलावले. एक महिन्यानंतर येथे वेगवेगळ्या कंपन्या येतील, तेथे तुम्हाला नोकरी मिळेल, असे सांगितले. बेरोजगार युवक-युवकांनी एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले. महिना होऊनही एकाही कंपनीचे प्रतिनिधी आले नाही. कुणाला नोकरीही मिळाली नाही. तेव्हा डोंगरे याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर बेरोजगार युवक-युवतींना शंका आली. त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र मागितले. तेव्हा आज देतो उद्या देतो असे म्हणत अनेक दिवस टाळले. डोंगरे याच्यासोबत काम करणारी एक तरुणी सर्वांना फोन करून प्रशिक्षणासाठी बोलावते.
डोंगरे याचे पूर्वी धंतोली येथे कार्यालय होते, ते त्याने बदलविले आहे. नवीन कार्यालयाबाबत त्याचे साथीदारही काही सांगत नाहीत. एकूणच हा सर्व प्रकार पाहता बेरोजगार तरुण-तरुणींना आपण फसवल्या गेल्याचे लक्षात आले. तेव्हा या पीडितांनी पोलिसात धाव घेतली. त्यांनी याबाबतची तक्रार सीताबर्डी व धंतोली पोलिसांकडे केली आहे. इतकेच नव्हे तर पोलीस आयुक्तांसह थेट मुख्यमंत्र्यांकडेही याची तकार केली आहे. फसवल्या गेलेल्या बेरोजगार तरुण तरुणींची संख्या कितीतरी अधिक असून कोट्यवधीची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तक्रार अर्ज मिळाला, चौकशी सुरू आहे

नोकरीच्या नावावर फसवणूक करण्यात आल्याबाबत पीडित युवकांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. याबाबत चौकशी केली जात आहे, असे पोलीस उपनिरीक्षक घोडे यांनी सांगितले.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
नोकरीच्या नावावर फसवणूक होत असल्याचे प्रकार हे नवीन नाहीत. सातत्याने असे प्रकार सुरू आहेत. व्यक्तिगतरीत्या कुणी फसवणूक केली असेल तर ती बाब समजली जाऊ शकते. परंतु जाहिरात देऊन, मोठमोठे आमीष दाखवून लोकांची फसवणूक होत असेल तर पोलीस करतात तरी काय? अशाच जाहिरातींद्वारे मोठमोठे आमिष दाखवून लोकांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार नागपुरात यापूर्वी झालेले आहेत. त्यानंतरही पोलिसांनी कुठलाही धडा घेतल्याचे दिसून येत नाही. सोशल मीडियावर कोण काय पोस्ट करीत आहे, यावर पाळत ठेवणाºया पोलिसांचे अशा जाहिरातींकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Gang of cheater in the name of job active in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.