नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून टोळीकडून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:46 PM2018-01-12T22:46:53+5:302018-01-12T22:51:27+5:30
बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्यानंतर एका टोळीने नागपुरातून पळ काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्यानंतर एका टोळीने नागपुरातून पळ काढला. प्रमोद अनंतवार (रा. शांतिनगर), रोहित तभाने (वय ३६), अमित टेंभूर्णीकर (वय ३६) आणि श्रीधर भेंडे (सर्व रा. नागपूर) या चौघांनी सीताबर्डीतील लोहा पुलाजवळ इरिक्सन ग्लोबल टेक्नॉलॉजी आऊटसोर्सिंग प्रा. लि. नावाने जॉब प्लेसमेंट एजन्सी सुरू केली. बेरोजगारांना चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचा उपरोक्त आरोपी दावा करीत होते. त्यांच्या या दाव्याला तिवसा (जि. अमरावती) जवळच्या समुद्रपूर गावातील दिनेश मनोहर पुनसे आणि त्यांचे १५ मित्र बळी पडले. २२ जून २०१७ ला या सर्वांना आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून त्यांची शैक्षणिक कागदपत्रे घेतली. त्यानंतर त्यांच्याकडून वेगवेगळ्या नावाखाली २ लाख, ९६ हजारांची रक्कम उकळली. बरेच दिवस होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे पुनसे आणि अन्य त्याच्या मित्रांनी आरोपींवर दबाव वाढवला. त्यामुळे त्यांना आरोपींनी वेगवेगळ्या कंपन्यांमधील नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. हे नियुक्तीपत्र घेऊन हे बेरोजगार संबंधित कंपनीच्या कार्यालयात गेले असता आरोपींनी दिलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी फसवणूक केल्याचे ध्यानात आल्यामुळे पीडित बेरोजगारांनी आरोपींच्या कार्यालयात धाव घेतली असता तेथे कोणताही आरोपी आढळला नाही. एवढेच काय त्यांनी त्यांचे कार्यालय बंद करून पळ काढल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी गुरुवारी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असता आरोपींनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आरोपी प्रमोद अनंतवार, रोहित तभाने, अमित टेंभूर्णीकर आणि श्रीधर भेंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.
१५ हजारात जिल्हा समन्वयक
आरोपी प्रमोद अनंतवार हा या चौकडीतील दलाल आहे. तो गावोगावच्या बेरोजगारांना हेरून त्यांच्यावर जाळे टाकायचा. तर, कार्यालयात बसलेले तभाने, टेंभूर्णीकर आणि भेंडे बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळायचे. प्रारंभी १५ हजार रुपये रजिस्ट्रेशन फी घेतली जायची. नोकरी लागल्यानंतर १५ ते २० हजार रुपये पुन्हा आम्ही एजंसीला देऊ, अशी हमीदेखिल आरोपी बेरोजगारांकडून घेत होते. केवळ १५ हजारात राज्य शासनाच्या आरोग्य विभागात ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रात जिल्हा समन्वयक किंवा जिल्हा समुपदेशक पदावर नियुक्ती करून देऊ, असे आरोपींनी पीडितांना सांगितले होते. तसे नियुक्तीपत्रही त्यांनी तक्रार करणा-या बेरोजगारांना दिले होते.
वर्धा, यवतमाळचेही पीडित
आरोपी प्रमोद अनंतवार, रोहित तभाने, अमित टेंभूर्णीकर आणि श्रीधर भेंडे यांनी केवळ अमरावती जिल्हाच नव्हे तर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील बेरोजगारांचीही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मात्र, या फसगतीची त्यांना कल्पनाच नाही. या प्रकरणाचा बोभाटा झाल्यामुळे आता पीडित तक्रारदारांची संख्या वाढू शकते, असे पोलीस सांगतात. दरम्यान, आज दुपारी सीताबर्डी पोलिसांनी आरोपी प्रमोद अनंतवार वगळता अन्य तिघांना अटक केली. त्यांना सायंकाळी कोर्टात हजर करून त्यांचा १५ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला. ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांच्या नेतृत्वात एपीआय प्रवीण काळे आणि त्यांचे सहकारी या आरोपींची चौकशी करीत आहेत. त्यांनी किती बेरोजगारांकडून अशा प्रकारे रक्कम उकळली, त्याचा चौकशीत खुलासा होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.