नागपुरात  गुन्हेगाराच्या टोळीने केली तरुणाची हत्या, तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:10 AM2019-10-29T00:10:39+5:302019-10-29T00:11:37+5:30

रस्त्यावर लावलेले शुभेच्छा फलक फाडण्याच्या कारणावरून कुख्यात गुन्हेगाराच्या टोळीने एका तरुणाची भीषण हत्या केली. ऐन दिवाळीच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्रीपासून प्रचंड तणावाचे वातावरण होते.

A gang of criminals murdered youth in Nagpur,tense | नागपुरात  गुन्हेगाराच्या टोळीने केली तरुणाची हत्या, तणाव

नागपुरात  गुन्हेगाराच्या टोळीने केली तरुणाची हत्या, तणाव

Next
ठळक मुद्देशुभेच्छा फलक फाडण्याच्या कारणावरून वाद : ऐन दिवाळीच्या रात्री घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यावर लावलेले शुभेच्छा फलक फाडण्याच्या कारणावरून कुख्यात गुन्हेगाराच्या टोळीने एका तरुणाची भीषण हत्या केली. ऐन दिवाळीच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्रीपासून प्रचंड तणावाचे वातावरण होते.
जितेंद्र वासुदेवराव बडे (वय २९) असे मृताचे नाव असून तो संजय गांधीनगरात राहत होता. जितेंद्र बडे त्याचे मित्र रितिक धनराज डेंगे (वय २०, रा. भोलेबाबानगर) आणि अभिजित खरात हे तिघे रविवारी मध्यरात्री उदयनगर चौकात गप्पा करीत होते. तेवढ्यात तेथे प्रसाद दशरथ रोकडे (वय २५, रा. दुबेनगर) आणि त्याचे चार ते पाच साथीदार आले. त्यांनी जितेंद्रला एक फलक फाडल्याबद्दल जाब विचारला आणि तू इकडचा दादा आहे, का असे विचारत त्याच्याशी वाद घातला. बडे त्याला पोस्टर फाडण्याबाबत काही समजावून सांगत असतानाच थांब तुला दाखवतो म्हणत आरोपी रोकडे आणि साथीदारांनी जितेंद्र बडेला आधी बेदम मारहाण केली आणि नंतर चाकूचे घाव घातले. बडेला गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी पळून गेले. गंभीर अवस्थेतील बडे याला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ऐन दिवाळीच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी सकाळपासूनच संजय गांधीनगरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींची शोधाशोध सुरू केली. हुडकेश्वर पोलिसांनी सोमवारी दुपारपर्यंत रोहण राऊत, सुमीत दहने, अभिषेक डोईफोडे आणि अनिमेश तागडे या रोकडेच्या साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू होती. तर, मुख्य आरोपी रोकडेला गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

बडे कुटुंबीयांवर आघात
आरोपी रोकडे हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध १५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तो स्वत:ला एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगून परिसरात गुंडगिरी करतो. तर, मृत बडे हा धंतोलीतील एका रुग्णालयात टेक्निशियन म्हणून काम करायचा. दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी घरातील तरुणाचा असा घात झाल्याने बडे कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला आहे.

Web Title: A gang of criminals murdered youth in Nagpur,tense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.