कळमनात महिला चोरट्यांची टोळी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:07 AM2021-07-01T04:07:41+5:302021-07-01T04:07:41+5:30
नागपूर : चोरी केल्यानंतर आरोपी लगेच घटनास्थळावरून फरार होऊन मुद्देमालाची विल्हेवाट लावतात. परंतु, पुन्हा चोरी करण्याच्या हव्यासापोटी महिला चोरट्यांनी ...
नागपूर : चोरी केल्यानंतर आरोपी लगेच घटनास्थळावरून फरार होऊन मुद्देमालाची विल्हेवाट लावतात. परंतु, पुन्हा चोरी करण्याच्या हव्यासापोटी महिला चोरट्यांनी घटनास्थळ सोडले नसल्यामुळे त्या इतवारी लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या.
बुधवारी दुपारी गोंदिया-इतवारी मेमू रेल्वेगाडीत आरोपी राणू गायकवाड (३०), स्वाती शेंडे (३२), गिरिजा खडसे (३०) आणि भारती पात्रे (३३) यांनी प्रवाशांच्या पर्स आणि मुद्देमाल चोरी केला. चोरी केल्यानंतर त्या कळमना रेल्वेस्थानकाजवळ थांबल्या. परतीच्या प्रवासात पुन्हा त्याच गाडीत चोरी करण्याचा विचार त्यांनी केला. साहित्य चोरी गेलेल्या प्रवासी महिला संगीता वर्मा (३३), रा. डोंगरगढ, संतोषी मांडले (२९), दोन्ही रा. डोंगरगड आणि शेख अमजद शेख मेहबूब (२७), रा. नागपूर यांनी इतवारी लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली. तक्रार मिळताच इतवारीचे सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक किरण वरठे, किरण भोयर, दीप्ती बेंडे, विजय सुरवाडे, श्रीधर पेंदोर, भिवगडे यांच्या पथकाने कळमना रेल्वेस्थानक गाठले. यावेळी आरपीएफ जवान बी. लॅम्बो, विवेक कनोजिया आणि पासवान हे गस्त घालत होते. त्यांच्या मदतीने कळमना स्थानक परिसरात शोध घेतला असता आउटरकडील भागात चार महिला थांबलेल्या दिसल्या. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गोंदियाला जायचे असल्याचे सांगितले. परंतु, स्टेशनवर गाडीची वाट पाहत थांबण्याऐवजी आउटरकडील भागात त्या थांबल्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. पैसे काढून पर्स आउटरवर फेकल्याचे त्यांनी सांगितले. लगेच पोलिसांनी आरोपींना सोबत घेऊन झुडपात शोध घेतला असता पर्स आणि इतर मुद्देमाल मिळाला. त्यानंतर आरोपी महिलांना अटक करण्यात आली. फिर्यादी महिलांच्या पर्समध्ये रोख रक्कम, एटीएम आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
.............