नागपुरात अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 07:50 PM2018-09-25T19:50:51+5:302018-09-25T19:52:48+5:30
एका घरफोडी प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ५ च्या हातात अट्टल चोरट्यांची टोळीच लागली. चोरट्यांनी आतापर्यंत १३ घरफोड्या केलेल्या असून, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. चोरट्यांकडून एक लाख ६७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका घरफोडी प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ५ च्या हातात अट्टल चोरट्यांची टोळीच लागली. चोरट्यांनी आतापर्यंत १३ घरफोड्या केलेल्या असून, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. चोरट्यांकडून एक लाख ६७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मो. आरिफ मो. मिजान (२२, रा. हस्तीनापूर), साबीर रज्जाक शेख (२२, रा. वाजपेयीनगर, नाका क्र. ४ समोर), अंकुश छबीलाल केन (२१, रा. मांडवा, उप्पलवाडी, कामठी रोड), अशी अटकेतील अट्टल चोरट्यांची नावे आहेत. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलबा प्रल्हाद पराते (३२, रा. चित्रशाळानगर, गणेशनगर), असे फिर्यादीचे नाव आहे. ४ सप्टेंबर रोजी ते कुटुंबासह नातेवाईकाकडे गेले असताना त्यांच्याकडे घरफोडी झाली. त्यांच्या घरून चोरट्यांनी दागिने आणि रोख असा एकूण ३४ हजारांचा ऐवज पळविला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे युनिट क्र. ५ करीत होते. दरम्यान, पथक पेट्रोलिंगवर असताना काही चोरटे हे चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी आले असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे कळमना हद्दीत सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दागिने आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख ६७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध कळमना पोलीस ठाण्यात चार, नवीन कामठी पोलीस ठाण्यात चार, यशोधरानगर पोलीस ठाण्यात तीन आणि जरीपटका पोलीस ठाण्यात एक असे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) बी. जी. गायकर, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, विक्रांत सगणे, दिनेश लबडे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चेचरे, सुनील राऊत, पोलीस हवालदार राजेश यादव, मंगेश लांडे, कन्हैया लिल्हारे, अजय बघेल, प्रशांत लाडे, नायक पोलीस शिपाई अरुण चांदणे, रवी शाहू, नामदेव टेकाम, नरेंद्र ठाकूर, पोलीस शिपाई प्रीतम ठाकूर, चालक पोलीस शिपाई अमोल भक्ते, उत्कर्ष राऊत यांनी पार पाडली.