एसटीमध्ये आढळली एमडी तस्करांची टोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:09 AM2021-01-21T04:09:09+5:302021-01-21T04:09:09+5:30
नागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने केलेल्या कारवाईत मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीकडून ५.६० लाख रुपयांचा एमडी जप्त करण्यात ...
नागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने केलेल्या कारवाईत मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीकडून ५.६० लाख रुपयांचा एमडी जप्त करण्यात आला.
शेख शहबाज शेख सलीम (१९, रा. हसनबाग कब्रस्तान), मो. जुबेर मो. बशीर (२५, रा. टेका नवी वस्ती) आणि मो. तौहिद मो. अनिस (२३, रा. न्यू बिडीपेठ) अशी आरोपींची नावे आहेत. या टोळीचा प्रमुख मो. तौहिद हा आहे. तो अनेक दिवसांपासून बिडीपेठ येथील आपल्या घरातून एमडीची विक्री करतो. शहबाज आणि जुबेरही अनेक दिवसांपासून एमडी तस्करी करतात,. असे तपासात पुढे आले आहे. तौहिदने १७ जानेवारीला शहबाज आणि जुबेरला एमडी आणण्यासाठी मुंबईला पाठविले. दोघांनी मुंबईच्या एका तस्करापासून एमडीची खरेदी केली. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी दोघेही बसने मुंबईवरून धुळे येथे पोहोचले. तेथून आधी जळगाव आणि अमरावतीला आले. अमरावतीवरून एसटीने मंगळवारी रात्री नागपूरला रवाना झाले. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. एनडीपीएस सेलने दोघांना पकडण्यासाठी जाळे टाकले. पहाटे ३.२० वाजता व्हेरायटी चौक येथे बस थांबवून पोलिसांनी तपासणी केली असता दोघांकडे ५.६० लाख रुपये किमतीच्या ५६.८ ग्रॅम एमडी आढळली. त्यांनी तौहिदच्या सांगण्यावरून मुंबईला गेल्याची माहिती दिली. दरम्यान, तौहिदही एमडीची डिलिव्हरी घेण्यासाठी व्हेरायटी चौक येथे पोहोचला असता पोलिसांनी त्यालाही अटक केली. आरोपी पहिल्यांदा पोलिसांच्या हाती लागले आहेत. तिन्ही आरोपी आपल्या घरून एमडीची विक्री करतात. त्यांच्या हालचालींची माहिती न मिळाल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. तर सक्करदरा, नंदनवन तसेच टेका परिसर एमडी तस्करीसाठी नेहमीच चर्चेत राहतो. आरोपींकडून तीन मोबाइल जप्त करण्यात आले असून, त्या आधारे आरोपींचे संपर्क शोधण्यात येत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सार्थक नेहेते, सहायक पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरले, सुरज सुरोशे, उपनिरीक्षक देविदास बांगडे, बलराम झाडोकार, प्रीती कुळमेथे, प्रदीप पवार, समाधान गिते, नामदेव टेकाम, विनोद गायकवाड, नितीन मिश्रा, कपिल तांडेकर, अश्विन मांगे, राहुल गुमगावकर, समीर शेख, नितीन साळुंखे, राहुल पाटील, रुबीना शेख यांनी पार पाडली.
...............