सामूहिक बलात्कार प्रकरण : वेकोलिचे सीएमडी ‘आॅन दि स्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 09:56 PM2018-08-30T21:56:37+5:302018-08-30T21:57:40+5:30
उमरेड वेकोलि क्षेत्रातील गोकुल खाणीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर १६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तातडीने उमरेड येथे पोहोचले होते. वेकोलिचे अध्यक्ष, सहप्रबंध, निदेशक राजीवरंजन मिश्रा मात्र न पोहचल्याने त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठविण्यात आली होती. विशेषत: ‘लोकमत’ने २३ आॅगस्ट रोजीच्या अंकात ‘कुठे गेले वेकोलिचे सीएमडी’ असा प्रश्नही उपस्थित केला होता. अखेरीस घटनेच्या तब्बल १६ दिवसानंतर गुरुवारी (दि.३०) सकाळी ११.३० वाजता वेकोलिचे सीएमडी राजीवरंजन मिश्रा ‘आॅन दि स्पॉट’ पोहोचले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड वेकोलि क्षेत्रातील गोकुल खाणीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर १६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तातडीने उमरेड येथे पोहोचले होते. वेकोलिचे अध्यक्ष, सहप्रबंध, निदेशक राजीवरंजन मिश्रा मात्र न पोहचल्याने त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठविण्यात आली होती. विशेषत: ‘लोकमत’ने २३ आॅगस्ट रोजीच्या अंकात ‘कुठे गेले वेकोलिचे सीएमडी’ असा प्रश्नही उपस्थित केला होता. अखेरीस घटनेच्या तब्बल १६ दिवसानंतर गुरुवारी (दि.३०) सकाळी ११.३० वाजता वेकोलिचे सीएमडी राजीवरंजन मिश्रा ‘आॅन दि स्पॉट’ पोहोचले. गोकुल खाणीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी सामोरे जात विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. घटना खूप मोठी, अत्यंत दु:खद, दुर्भाग्यपूर्ण आहे. हे व्हायला नको होते. आमच्या उणिवा आम्हाला लक्षात आल्या. त्यात आता नक्कीच सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. पीडितेवर उपचार महत्त्वाचे होते. त्यामुळे मला दवाखान्यात अधिक लक्ष देणे गरजेचे वाटले. शिवाय मी जर दवाखान्यात गेलो नसतो तर कदाचित योग्य पद्धतीने दखलही घेतल्या गेली नसती, ही बाबदेखील त्यांनी पत्रकारांसमक्ष मांडली.
मी स्वत: एक दिवसाआड दवाखान्यात जात आहे. पीडितेच्या कुटुंबीयांशी सातत्याने संपर्कात आहे. सध्या तिच्यात कमालीची सुधारणा होत असून चालणे, फिरणे आणि थोडेफार बोलणे सुरू केल्याचीही बाब मिश्रा यांनी सांगितली. पीडितेचा डोळा फुटला नाही. डोळा वाचलेला आहे. ती रुग्णालयातून उत्तम प्रकृतीसह बाहेर पडावी, हाच आमचा प्रयत्न असून आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असेही ते बोलले.
शौचालय अत्यावश्यक होते याबाबत दुमत नसल्याचे सांगत युद्धस्तरावर उपाययोजना आखली जात असल्याचे ते म्हणाले. वजनकाटा क्रमांक १ लगत रेडिमेड स्वच्छतागृह गुरुवारी लावण्यात आले. स्वच्छतागृह उभारणाऱ्या आणि या सर्व बाबींवर दुर्लक्ष करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार आहात, या प्रश्नावर त्यांनी संबंधित अधिकाºयांवर कडक कारवाई होणार असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच ठोस कारवाई होण्याचे संकेत त्यांनी दिले. ज्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहेत, त्यासाठी फक्त दोन दिवस थांबा, अशीही विनंती त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत नागपूर मुख्यालयातील एस. एम. चौधरी, तरुण श्रीवास्तव, उमरेड वेकोलिचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक एम.के. मजुमदार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नैतिक जबाबदारी घेतो
सोशल मीडियावर पीडितेचे छायाचित्र फिरविल्या गेले. काहींनी ‘सेल्फी’ काढण्याचाही प्रयत्न केला, ही गंभीर बाब सांगत पीडित वेगाने बरी होत आहे. पोलीस आपले काम करीत आहे. आम्ही आपले काम करीत आहोत. मी नैतिक जबाबदारी घेतो. मुद्दा संवेदनशील करून काहीच उपयोग नाही, अशाही संवेदना त्यांनी मांडल्या.
त्यांचा दोष काय?
या प्रकरणात गंगाधर भुते, गजानन झोडे या लहान कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई झाली. या दोन्ही निलंबित सुरक्षा कर्मचाऱ्यांचा दोष काय, असा प्रश्न पत्रकारांनी मिश्रा यांना विचारला. त्या दोघांनाही घटनास्थळावरून हटविण्यात आले होते, ही बाब त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर कळली, असे स्पष्टीकरण देत चुकीची कारवाई कुणावरही होणार नाही, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांशी असभ्यता
दिनेश खाणीचे प्रकल्प आणि नियोजन अधिकारी ए. ए. अन्सारी हे शेतकऱ्यांसोबत असभ्यतेची वागणूक देतात. विचारणा करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना हाकलून लावतात. अन्सारी यांच्याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. ही गंभीर बाबही पत्रकारांनी राजीवरंजन मिश्रा यांच्यासमक्ष मांडली. ‘ये कौन है अन्सारी, हटवा त्याला’ अशा शब्दात त्यांनी निराशा व्यक्त केली. ३०० शेतकऱ्यांची मुलं-मुली अजूनही नोकरीपासून वंचित असल्याची बाबही मिश्रा यांच्याकडे व्यक्त करण्यात आली.
‘हा, डॉक्टर नही है’
गोकुल खाणीत असलेल्या वैद्यकीय असुविधेबाबत प्रश्न उपस्थित करताच ‘मै आपके हर खबर को पढता हूँ. बेड है, दवा है, डॉक्टर नही है. ये आपने लिखा. ये बात भी सही है’ ही बाब मान्य करीत आमच्याकडे डॉक्टरांची कमतरता असल्याचे मिश्रा बोलले. हीच बाब ध्यानात घेत तीन ठिकाणी केंद्रीय हॉस्पिटल बनविण्याची योजना आहे. १ एप्रिल २०१९ पासून हे काम सुरू होणार असून बडकुही, नागपूर आणि वणी या ठिकाणी हे कार्य सुरू होईल. १२६ डॉक्टरांची नियुक्तीही लवकरच करणार आहोत. येत्या एक महिन्यात गोकुल खाणीत डॉक्टरांची नियुक्ती करणार असल्याचीही बाब त्यांनी व्यक्त केली.