टोळीने केला लग्नाचा ‘खेळखंडोबा’
By admin | Published: March 30, 2016 03:02 AM2016-03-30T03:02:36+5:302016-03-30T03:02:36+5:30
मुली शोधता शोधता वय निघून जात असताना अचानक एखाद्या सुस्वरूप तरुणीने आयुष्याची जोडीदार बनण्यास होकार द्यावा, ....
नरेश डोंगरे नागपूर
मुली शोधता शोधता वय निघून जात असताना अचानक एखाद्या सुस्वरूप तरुणीने आयुष्याची जोडीदार बनण्यास होकार द्यावा, तिच्या नातेवाईकांनीही मोठ्या आस्थेने जावई म्हणून आदरातिथ्य करावे, असे झाले तर त्या व्यक्तीला किती आनंद होईल, ते केवळ ती व्यक्तीच सांगू शकते. अन् लग्न समारंभावर लाखो रुपये खर्ची घातल्यानंतर लग्नाचे सुख उपभोगू न देता हळदीच्या ओल्या अंगानेच नवरी मुलगी पळून जात असेल, त्यानंतर तिचे नातेवाईक ‘झाले गेले विसरून जा’, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्या व्यक्तीला होणारे दु:खही केवळ तीच व्यक्ती जाणू शकते. सुख-दु:खाचा असा बाजार मांडणाऱ्या कळमना- पाचपावलीतील ‘लगिनजोड्या-संसारमोड्या टोळीने ’ अनेकांच्या जीवनाचा खेळखंडोबा केला आहे.
२५ मार्चला कळमना पोलिसांनी जेरबंद केलेल्या या टोळीने अवघ्या नऊ दिवसात दोन गुजराती इसमांचे लग्न लावले आणि दोन आठवड्यातच त्यांचा संसार उधळून विवाहाचे गोडगुलाबी स्वप्नही मोडले. टोळीचा शिकार ठरलेल्या पटेल नामक व्यक्तीने मंगळवारी कळमना ठाण्यात येऊन आपली कैफियत ऐकवली. त्यातून या टोळीतील सदस्यांच्या शक्कलबाजीचा खुलासा झाला आहे.
गुजरातमधील काही भागात मुलींचा जन्मदर फारच कमी आहे. त्यामुळे त्या भागातील अनेक तरुण, मुली शोधता शोधता प्रौढ होतात. परिणामी आजूबाजूच्या प्रांतात जोडीदारासाठी रक्कम खर्ची घालून ते आपले लग्न करून घेतात. रामभरोसे पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गीर सोमनाथ वेरावेल येथील पीयूष कृष्णदास रूपारेल यांनी अशाच प्रकारे २७ फेब्रुवारी २०१६ ला सीताबर्डीतील श्री ब्रह्मादत्त पुजारी सेवा मंडळात नेहा हेडावू नामक तरुणीशी लग्न लावून घेतले. हे लग्न करण्यासाठी त्याने चार ते पाच लाखांचा खर्च केला. आपल्या गावात धूमधडाक्यात रिसेप्शन दिले. ‘पप्पू पास हो गया’च्या थाटात त्याच्या आप्तस्वकियांनी, गावकऱ्यांनीही आनंदोत्सव साजरा करीत पीयूषला भावी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, कसले काय. नेहाने त्याला लग्नानंतर तब्बल १०-१२ दिवस हातच लावू दिला नाही. त्यानंतर तिच्या टोळीतील सूत्रधाराचा फोन आला आणि नेहाची मावशी स्फोटात मेल्याचे सांगत तिला तातडीने नागपुरात घेऊन येण्यास सांगितले. भाबडा पीयूष सासूच्या मृत्यूचा शोक मनवत रेल्वेने १२ मार्चला नागपूर स्थानकावर आला अन् येथून नेहा तिच्या साथीदारांसोबत गायब झाली.