अंघोळ करीत असलेल्या मुलीचा व्हिडिओ दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 06:45 AM2021-09-03T06:45:00+5:302021-09-03T06:45:02+5:30
Nagpur News अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मानकापूर पोलिसांनी विद्यार्थिनीच्या नातेवाइकासह तीन आरोपींना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मानकापूर पोलिसांनी विद्यार्थिनीच्या नातेवाइकासह तीन आरोपींना अटक केली आहे. (Gang rape of a minor girl by showing a video of a girl taking a bath)
मंगेश नामदेव हुडके (३२), नीलेश ब्रिजलाल सिंह ठाकूर (४५) आणि आकाश राजेश खोटे (२९), अशी आरोपींची नावे आहेत. पीडित १७ वर्षांच्या विद्यार्थिनीचा मंगेश हुडके नातेवाईक आहे. मंगेशची ठाकूर सोबत मैत्री आहे, तर आकाश ठाकूरकडे किरायाने राहतो. यामुळे विद्यार्थिनी तिघांनाही ओळखते.
११ मार्च २०२० रोजी विद्यार्थिनी कोचिंग क्लासवरून येत असताना रस्त्यात ठाकूरने तिला आंघोळ करीत असलेल्या मुलीचा व्हिडिओ दाखवून मुलगी कोण आहे, हे ओळखण्यास सांगितले. व्हिडिओतील मुलीची शरीरयष्टी स्वत:सारखी असल्यामुळे विद्यार्थिनी घाबरून तेथून निघून गेली. त्यानंतर १३ मार्चला ठाकूरने विद्यार्थिनीला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन सोबत चलण्यास सांगितले.
भीतीपोटी विद्यार्थिनी ठाकूरच्या कारमध्ये बसली. ठाकूरने तिच्या डोळ्यावर पट्टी आणि हातही बांधले. तिला जबरदस्ती दारू पाजली आणि एका घरात नेले. तेथे मंगेश आणि आकाश उपस्थित होते. ठाकूर आणि मंगेशने विद्यार्थिनीवर बलात्कार केला. त्यानंतर मंगेश आणि ठाकूर व्हिडिओ डिलीट करण्यासाठी तिला तीन ते चार लाख रुपये मागू लागले. विद्यार्थिनीने त्यांना २५ ते ३० हजार रुपये दिले. ठाकूरने तिच्या मोबाइलमधून तिच्या बहिणीचा फोटो घेतला होता.
विद्यार्थिनीने संधी साधून त्याच्या मोबाइलमधून फोटो डिलीट केला. ४ मार्च २०२१ रोजी ठाकूर आणि मंगेश नेहमीच्या ठिकाणी विद्यार्थिनीला घेऊन गेले. फोटो डिलीट का केला म्हणून तिला मारहाण करू लागले. सिगारेटने चटके देण्याची धमकी देऊन त्यांनी दारू पाजून पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. मंगेशने तिला घरातील ५० हजार रुपये आणण्यास सांगितले. तेथून वाकी येथील एका फार्महाउसवर नेऊन पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.
कुटुंबीयांचा खून, बहिणीवर बलात्काराची धमकी दिल्यामुळे तिने कोणालाच काही सांगितले नाही; परंतु कुटुंबीयांनी तिलाच चुकीचे समजून आजी-आजोबांकडे मध्यप्रदेशात पाठविले. २२ ऑगस्टला रक्षाबंधनासाठी तिचे आई-वडील मुलीला भेटण्यासाठी मध्यप्रदेशात गेले. तेथे तिने आई-वडिलांना आपबीती सांगितली. त्यानंतर नागपुरात आल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी सामाजिक कार्यकर्ते सुनीता ठाकुर, संगीता उमाठे, मनीषा रामटेके, हफीज साबरी यांच्या मदतीने मानकापूर ठाण्यात आरोपींविरुद्ध बलात्कार, पोक्सो, मारहाण, लुटमारीचा गुन्हा दाखल केला. मानकापूर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
..........