शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर सामूहिक बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 09:20 PM2023-06-28T21:20:24+5:302023-06-28T21:20:46+5:30
Nagpur News सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून दोन आरोपींनी एका ३४ वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.
नागपूर : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून दोन आरोपींनी एका ३४ वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. सीताबर्डी पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोन आरोपींना गजाआड केले आहे.
पिंटू ऊर्फ रत्नदीप रतिराम गजभिये (वय ३९, रा. गाडगेबाबानगर, नंदनवन) आणि कार्तिक चौधरी (वय ५०, रा. बिनाकी ले-आऊट, यशोधरानगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंटू हा खासगी वाहनावर चालक असून, कार्तिक चौधरी एका बियाणे विक्रीच्या दुकानात काम करतो. पीडित महिला मध्य प्रदेशातील सिहोर येथील रहिवासी आहे. ती पतीपासून विभक्त झाली आहे. तिला ११ आणि १२ वर्षांची दोन मुले आहेत. तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून महिलेची पिंटूसोबत ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. पिंटू तिला आर्थिक मदत करीत होता.
२२ जूनला त्याने पीडित महिलेशी संपर्क साधून तुझ्यासाठी नागपुरात नोकरी शोधल्याची बतावणी करून नागपुरात येण्यास सांगितले. नागपूरला येण्यासाठी आरोपी पिंटूने तिच्या खात्यात रक्कमही पाठविली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी महिला बसने मध्य प्रदेश बसस्थानकावर उतरली. तेथे पिंटूच्या मित्राने तिला दुचाकीवर बसविले. तो तिला नागपुरात घेऊन तासभर फिरला. त्यानंतर सीताबर्डी परिसरात पिंटू हा कार्तिक चौधरीसोबत कारने आला. पिंटू व कार्तिकने महिलेला कारमध्ये बसवून सावनेर मार्गावरील एका रिसॉर्टवर नेले. तेथे शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून दोघांनीही तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
सकाळी जाग आल्यानंतर महिलेला आपल्यावर बलात्कार झाल्याचे लक्षात आले. तिने पिंटूला खडसावले असता, त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. महिलेला सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीकडे सोडून पिंटू व कार्तिक चौधरी पसार झाले. पीडित महिलेने सक्करदरा पोलिस स्टेशन गाठले. परंतु घटनास्थळ सीताबर्डी ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने महिलेस सीताबर्डी ठाण्यात तक्रार देण्यास सांगण्यात आले. महिलेने सीताबर्डी ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सीताबर्डीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. गुरुवारपर्यंत दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी मिळाली आहे.
..........