नागपूरनजीकच्या वाडी भागात मतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 07:41 PM2019-02-02T19:41:01+5:302019-02-02T19:42:15+5:30
वाडी पोलीस ठाणे अंतर्गत एका मतिमंद तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी पीडित तरुणीच्या नातेवाईकाच्या तक्रारीवर आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२), एफ, जे एन, एल, ५०६ ब, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाडी पोलीस ठाणे अंतर्गत एका मतिमंद तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी पीडित तरुणीच्या नातेवाईकाच्या तक्रारीवर आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२), एफ, जे एन, एल, ५०६ ब, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
व्यंकटेश कलराम पप्सलेटी (३२) रा. गरवाल जि. करनूल (तेलंगणा) आणि रामू गोपाल बोई (२६) रा. गणेशपूर सोलापूर रोड उस्मानाबाद अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हे पीडित तरुणीचे नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. पीडित तरुणी ही आठ महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले जाते. पोलीस सूत्रानुसार २५ वर्षीय मतिमंद तरुणीशी एप्रिल ते जून २०१८ दरम्यान आरोपींनी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी हे नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. या दरम्यान आरोपीची मतिमंद तरुणीशी भेट झाली. दोघांनीही तिच्या मतिमंद होण्याचा गैरफायदा घेऊन तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. पीडित तरुणी या दरम्यान गर्भवती झाली. हा प्रकार उघडकीस येताच याबाबत पीडित तरुणी व तिच्या नातेवाईकांनी आपसात समेट घडवून आणण्यासाठी समाजाची बैठक बोलावली. या बैठकीत पीडित मुलीला कुठलाही न्याय मिळाला नाही. तेव्हा तिच्या नातेवाईकांनी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.
भाषेचा अडसर
पोलीस सूत्रानुसार पीडित तरुणी आणि तिचे नातेवाईक जेव्हा तक्रार दाखल करण्यासाठी ठाण्यात आले, तेव्हा ते दक्षिण भारतीय भाषा (तेलगू) बोलत होते. त्यामुळे पोलिसांना त्यांची भाषा समजत नव्हती. पीडित तरुणी तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सांगू शकत नव्हती. पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात घेऊन गेले. तेव्हा ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले. पीडित तरुणीसमोर आरोपी व्यकंटेश अचानक आल्याने ती त्याच्याकडे इशारा करू लागली. तेव्हा तिला नातेवाईकांनी प्रेमाने विचारले असता तिने कुटुंबीयांना आपबिती सांगितली.
मतिमंद असल्याचा उचलला फायदा
आरोपींना माहिती होते की तरुणी मतिमंद आहे. ती त्यांचे नाव सांगू शकणार नाही. याचा फायदा उचलत तिच्यावर आरोपींनी सामूहिक अत्याचार केला. पीडित तरुणीने जेव्हा व्यंकटेशला अचानक समोर पाहिले तेव्हा तिची प्रकृती बिघडली. रुग्णालयात गेल्यावर ती गर्भवती असल्याचे समजले. कुटुंबीयांनी आरोपीला जाब विचारला. त्यांच्यावर बराच दबाव टाकला तेव्हा त्यांनी अत्याचार केल्याची कबुली दिली. सुरुवातीला हे प्रकरण आपसात सोडवण्याचा प्रयत्न झाला. यासाठी सामाजिक स्तरावर बैठक घेण्यात आली. परंतु त्यात न्याय न मिळाल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.