वेकोलितील महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार : दगडाने ठेचले, डोळे फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 07:01 PM2018-08-14T19:01:34+5:302018-08-14T19:12:11+5:30
भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात चौघांनी एका २६ वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारीसुरू असतानाच महिलेवरील बलात्काराच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी चौघेही ट्रकचे चालक आणि वाहक असून, यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले तर अन्य दोघे घटनास्थळावरून पसार झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात चौघांनी एका २६ वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारीसुरू असतानाच महिलेवरील बलात्काराच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी चौघेही ट्रकचे चालक आणि वाहक असून, यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले तर अन्य दोघे घटनास्थळावरून पसार झाले.
बलात्कारानंतर कुणाकडेही वाच्यता होऊ नये आणि आपले पाप लपविण्यासाठी या नराधमांनी ‘त्या’ महिलेला दगडाने ठेचले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकारात पीडित महिलेचे दोन्ही डोळेसुद्धा बलात्काऱ्यांनी फोडले. तिला जीवे मारण्याचा प्रकार केला. सुमारे अर्ध्या तासानंतर एका वृद्ध ट्रकचालकामुळे ही बाब उजेडात येताच सर्वत्र धावपळ सुरू झाली.
अत्यंत निर्जनस्थळी बांबूपासून तयार करण्यात आलेल्या तट्ट्यांच्या शौचालयात हा किळसवाणा प्रकार घडला. महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर झाली असून, तिच्यावर तातडीने वेकोलि येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तिची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याचे ध्यानात येताच, लागलीच वेकोलि येथून तिला नागपूरला हलविण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
शेतकरी कुटूंबातील
वेकोलि उमरेड क्षेत्रांतर्गत गोकुल खदान येते. सुमारे तीन वर्षांपासून ही खदान या क्षेत्रात सुरू झाली आहे. पीडित महिला मूळची मध्यप्रदेश येथील आहे. तिचे आजोबा उमरेड तालुक्यातील हेवती येथे वास्तव्याला आहेत. हेवती येथील शेती वेकोलित समाविष्ट केल्यानंतर सदर महिलेला वेकोलि येथे नोकरी मिळाली. सुमारे एक वर्षापासून गोकुल खदान येथे ‘धर्मकाँटा’ करण्याच्या स्थळी लिपिक पदावर कार्यरत होती.
वृद्ध चालकाची सतर्कता
नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडल्यानंतर या महिलेने दुपारच्या सुमारास भोजन केले. त्यानंतर ती सुमारे ४०० फुटावर असलेल्या शौचालयाकडे लघुशंकेसाठी गेली. अशातच तिच्यावर पाळत ठेवून असलेल्या चौघांनी तिचा पाठलाग केला. तिला गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान पाऊस सुरू असल्याने आणि कार्यालय ते शौचालय अंतर लांबचे असल्याने कुणाच्याही लक्षात ही बाब आली नाही. पाऊस थांबताच काही वेळेनंतर एक वृद्ध ट्रकचालक या परिसरातून जात असताना महिलेचा किंचाळण्याचा आवाज आला. शौचालयाकडे धाव घेताच अतिशय गंभीर परिस्थितीत रक्तबंबाळ अवस्थेत महिला विव्हळत होती. लागलीच या वृद्धाने कार्यालयाकडे धाव घेत संपूर्ण प्रकार सांगितला.
नराधम होते दडून
घटना लक्षात येताच तेथील कर्मचाऱ्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. अशातच दोघेजण संशयास्पद अवस्थेत ट्रकमध्ये दडून असलेले कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडले. कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. या दोन्ही जणांचे शर्ट रक्ताने माखलेले होते. अन्य दोघे घटनास्थळावरून पसार झाल्याचीही बाब उघडकीस आली.