मोबाईलच्या ‘लोकेशन’मुळे बनावट सोन्याची नाणी विकणारी टोळी गजाआड

By योगेश पांडे | Published: February 9, 2024 09:55 PM2024-02-09T21:55:27+5:302024-02-09T21:56:16+5:30

टोळीतील आरोपी निघाले ‘मर्डरर’, बाप-लेकाचा समावेश : बडनेऱ्यातून आरोपींना अटक

Gang selling fake gold coins busted due to 'location' of mobile phones | मोबाईलच्या ‘लोकेशन’मुळे बनावट सोन्याची नाणी विकणारी टोळी गजाआड

मोबाईलच्या ‘लोकेशन’मुळे बनावट सोन्याची नाणी विकणारी टोळी गजाआड

नागपूर: सोन्याची नाणी स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवत एका चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याला बनावट नाणी देत दीड लाखाचा चुना लावणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात आली आहे. पोलिसांनी मोबाईलच्या ‘लोकेशन’वरून आरोपींचा शोध लावला व बडनेऱ्यातून त्यांना अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे बनावट सोन्याची नाणी विकणाऱ्या या टोळीतील सदस्यांत बापलेकदेखील असून त्यांच्यावर खूनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

राजू रामाधार वर्मा (३९, मिनीमातानगर), असे तक्रारदाराचे नाव आहे. तो मोमीनपुरा गार्डलाईन येथे चायनीजचा ठेला लावतो. २६ जानेवारीपासून पाच दिवस एक व्यक्ती त्याच्याकडे नाष्ट्यासाठी यायचा. ४ फेब्रुवारी रोजी तो राजूला भेटला व त्याला वर्धा येथे खोदकामादरम्यान हंडा मिळाल्याचे सांगितले. त्या हंड्यात सव्वादोन किलोंची सोन्याची नाणी असल्याचा त्याने दावा केला. त्याने राजूला चार नाणी दिली. राजूने ती नाणी सोनाराला दाखविली व ती सोन्याचे असल्याचे स्पष्ट झाले.

माझ्याकडे १५ लाख रुपये आहे, असे राजूने त्याला सांगितले. संबंधित व्यक्तीने त्याला रेल्वे स्थानकाजवळ १५ लाख रुपये घेऊन बोलविले. इतकी रोकड नसल्याने राजूने उधारीवर दीड लाख रुपये घेतले व पत्नीसह आरोपींना भेटायला गेला. आरोपींनी पैसे घेत राजूला काही नाणी दिली. राजूने ती नाणी सोनाराला दाखविली असता ती नकली असल्याची बाब समोर आली. हे ऐकून राजू हादरला. त्याने आरोपीला फोन लावला असता लगेच भेटतो असे त्याने सांगितले. मात्र, त्यानंतर तो फरार झाला.

राजूने तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी राजूला आरोपीला फोन लावायला लावला. आरोपीशी राजूचे बोलणे होत असताना पोलिसांनी त्याच्या फोनचे नेमके लोकेशन शोधले. त्यानंतर ‘ई-सर्व्हेलन्स’च्या माध्यमातून त्याच्यावर पाळत ठेवली. आरोपी बडनेरा येथे असल्याची माहिती निश्चित झाली.

पोलिसांनी बडनेरा येथील नवी वस्तीतील सद्गुरू वॉर्डगिरी परिसरातील झोपडीतून दादाराव सिताराम पवार (६५) , राहुल दादाराव पवार (३२), ईश्वर अन्ना पवार (२५) यांना ताब्यात घेतले. त्यांना गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी असा प्रकार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींचे रेकॉर्ड तपासले असता त्यांच्याविरोधात खामगाव, बुलडाणा, अकोला येथे फसवणूक, खून, चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली. हे सर्व आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमधील अत्रज फाट्याजवळील निवासी आहेत. पोलीस निरीक्षक संदीप बुआ, शशिकांत मुसळे, अनिल ठाकुर, प्रदीप सोनटक्के, चेतन माटे, शंभुसिंग किरार, पंकज बागडे, पंकज निकम, राशीद षेख, महेन्द्र सेलोकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हजारांहून अधिक पितळीची नाणी जप्त
आरोपी पितळीच्या नाण्यांना सोनेरी रंग मारून सोन्याची नाणी म्हणून विक्री करायचे. त्यांच्याकडून पोलिसांनी १ हजार १४८ पितळीची नाणी, मोबाईल व रोख १.०५ लाख असा १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांनी अशा प्रकारे आणखी कुणाची फसवणूक केली आहे का याचादेखील शोध सुरू आहे.

Web Title: Gang selling fake gold coins busted due to 'location' of mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.