पाच दिवसाच्या बाळाची विक्री करणारी टोळी अटकेत; डॉक्टरसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 01:16 PM2022-06-01T13:16:01+5:302022-06-01T13:18:29+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर यासंदर्भातील सौदा होणार होता. याची माहिती मिळताच सापळा रचून संबंधित टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे.
नागपूर : स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पाच दिवसाच्या बाळाची विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी सेलने रंगेहाथ अटक केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर यासंदर्भातील सौदा होणार होता. याची माहिती मिळताच सापळा रचून संबंधित टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे.
एका अविवाहित जोडप्याला शारीरिक संबंधातून बाळ झाले. या जोडप्याला बाळ विकणाऱ्या टोळीने हेरले व लष्करीबाग येथील महिला हिवंका ऊर्फ वर्षा मेश्राम (५२) हिने एका महिलेचे बाळ एका सामाजिक कार्यकर्त्याला तीन लाखांत विकण्याचा सौदा केला. यासंदर्भात पोलिसांना टीप मिळताच त्यांनी सापळा रचला व सामाजिक कार्यकर्त्याला नोटांचे डमी बंडल दिले. पैसे स्वीकारून आरोपी महिलेने तिच्याजवळील बाळ सामाजिक कार्यकर्त्याला दिले. त्यानंतर लगेच दबा धरून बसलेल्या पथकाने आरोपीला अटक केली. यासोबतच रत्ना भालाधरे (३३, बस्तरवाडी, दहीबाजार पूल, इतवारी), बिपीन उके (३४, कोहळे ले आऊट), अमोर रंगारी (३३, बंसीनगर, भांडेवाडी), मंगला तांबे (५२, कमाल चौक, लष्करीबाग), यांनादेखील ताब्यात घेण्यात आले.
अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) डाॅ. अक्षय शिंदे, सहायक पोलीस आयुक्त रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती नंदा एन. मनगटे, ललिता तोडासे, सहायक पोलीस निरीक्षक गजानन चांबारे यांच्यासह राजेंद्र अटकळे, ज्ञानेश्वर ढोके, मनीष पराये, सुनील वाकडे, सुधीर तिवारी, शरीफ शेख, चेतन गेडाम, मनीष रामटेके, आरती चव्हाण, प्रभा खानझोडे, शुभांगी दातीर, पल्लवी वंजारी, प्रतिमा मेश्राम, वर्षा हटवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
डॉक्टरदेखील विक्रीत सहभागी
या बाळासंदर्भात अटकेतील आरोपींना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आढळलेल्या डिस्चार्ज कार्डवरून एक २१ वर्षीय महिला व तिचा प्रियकर मुकुल सुरेश वासनिक (२२, बोरकर ले-आऊट, निर्मल कॉलनी) यांचे ते बाळ असल्याची बाब समोर आली. डॉ. कल्याणी डेव्हीड थॉमस (४८, हिवरी नगर पॉवर हाऊस) हिच्या मदतीने संबंधित टोळीला विक्रीसाठी दिले होते. पोलिसांनी डॉ.कल्याणी थॉमस व संबंधित महिलेला ताब्यात घेतले. सर्व नऊ आरोपींविरोधात सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.