नागपुरात टोळक्याची दहशत; महिलेला पायावर लोटांगण घालत मागायला लावली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 09:00 IST2024-12-20T08:58:09+5:302024-12-20T09:00:45+5:30
नागपुरात एका महिलेला लोटांगण घालून माफी मागण्यास पाडायला लावल्याने तिघांना अटक करण्यात आली आहे.

नागपुरात टोळक्याची दहशत; महिलेला पायावर लोटांगण घालत मागायला लावली माफी
Nagpur Crime : नागपुरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून टवाळखोरांच्या जमावाने पेट्रोल पंप चालक आणि एका महिलेला धक्काबुक्की आणि दमदाटी केली. एवढंच नाही तर महिलेला लोटांगण घालत माफी मागण्यास भाग पाडण्यात आलं. त्यानंतर दहशत पसरवण्यासाठी आरोपींनी या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
नागपुरात एका महिलेला माफी मागण्यास भाग पाडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. एका भटक्या कुत्र्याचा छळ केल्याने विकास बोरकर या महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ही घटना बुधवारी रात्री घडली. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर विकास त्याच्या काही मित्रांसह परतला आणि महिलेला जमिनीवर झोपवून माफी मागण्यास भाग पाडले. ४४ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून बोरकर आणि त्याचे मित्र राजेश मिश्रा आणि पंकज भरेकर यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
१८ डिसेंबर रोजी हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. नागपूर हिंगणा रोड परिसरात असलेल्या इलेक्ट्रिक झोन परिसरातील पंपचालक महिलेला दोन तरुण पेट्रोल पंपावर विनाकारण फिरताना दिसले. त्यामुळे या महिलेने त्या दोन तरुणांना हटकले. त्यावरुनच तिघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर हे तरुण गुंडप्रवृत्तीच्या लोकांना पेट्रोल पंपावर घेऊन आले. त्यांनी रात्री १० च्या सुमारास पेट्रोल पंपावर गोंधळ घातला. या भागात आमची दादागिरी चालते असे म्हणत गुंडांनी महिलेला माफी मागायला लावली. मात्र एवढ्यावर या तरुणांचे समाधान झालं नाही. जमावाचं नेतृत्व करणाऱ्या एका गुंडांने महिलेला पायावर लोटांगण घेत माफी मागायला लावली आणि या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे.
"सात आठ जण पेट्रोल पंपावर आले आणि त्यांनी मला माफी मागायला लावली. त्यानंतर माझा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. मी एकाचा मोबाईल धरुन ठेवला. मी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामुळे मला त्यांना गुंतवून ठेवायचे होते. त्यामुळे मी एकाचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यामुळे तो काही करु नाही शकला," असं पीडित महिलेने सांगितले.