महावितरणच्या रोहित्रातील तेल चोरणाऱ्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 08:38 PM2018-06-22T20:38:43+5:302018-06-22T20:42:49+5:30
महावितरणच्या रोहित्रातील तेल चोरणाऱ्या टोळीला चौगान येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे रामटेक पोलिसांनी अटक केली आहे. महावितरणच्या सुमारे ६० पेक्षा अधिक रोहित्रातील तेल चोरून विकल्याची कबुली टोळीतील सदस्यांनी पोलिसांना दिली आहे. कालू रघुनाथसिंग आणि दिलीप नरकसिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्याना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणच्या रोहित्रातील तेल चोरणाऱ्या टोळीला चौगान येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे रामटेक पोलिसांनी अटक केली आहे. महावितरणच्या सुमारे ६० पेक्षा अधिक रोहित्रातील तेल चोरून विकल्याची कबुली टोळीतील सदस्यांनी पोलिसांना दिली आहे. कालू रघुनाथसिंग आणि दिलीप नरकसिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्याना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मागील वर्षभरापासून रामटेक,नगरधन, मनसर,नेरला,चौगान परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरांच्या टोळीने गावाबाहेरील किंवा शेतात असलेल्या रोहित्रातील तेल चोरण्याचा सपाटा सुरू केला होता. रोहित्रातील तेल गायब होत असल्याने महावितरणचे स्थनिक अधिकारी आणि कर्मचारी देखील त्रस्त झाले होते. रात्रीच्या वेळी प्रत्येक रोहित्राच्या ठिकाणी गस्त घालणे शक्य नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले होते. चोरट्यांनी रोहित्रातील तेल चोरून नेल्याने परिसरातील वीज ग्राहकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. खंडित वीज पुरवठा सुरळीत करताना महावितरणचा जनमित्रांची दमछाक होऊ लागली होती.
दोन दिवसापूर्वी सदर चोरटे आपला कार्यभाग साधण्यासाठी चौगान गावात गेले होते. गावकऱ्यांना हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी विचारपूस केली आणि वस्तुस्थिती माहीत होताच महावितरणच्या अधिकारी वर्गाला माहिती दिली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चोरट्यांना रामटेक पोलिसांच्या हवाली केले. यातील एक आरोपी हा कांद्रीचा तर दुसरा उज्जैनचा रहिवासी आहे.
रोहित्रातील चोरलेले तेल सदर आरोपी कांद्री येथील धाब्यावर ट्रक चालकांना डिझेलमध्ये भेसळ करण्यासाठी विकत होते. आपला कार्यभाग साधण्यासाठी सदर आरोपी दुचाकी वाहनाचा वापर करायचे. रस्त्यापासून जवळच्या शेतात किंवा निर्मनुष्य ठिकाणी पण दुचाकी जाईल अशा ठिकाणी आपला कार्यभाग साधायचे. चोरी करण्यापूर्वी बांबूच्या मदतीने वीज पुरवठा खंडित करून पाईपच्या मदतीने रोहित्रातील तेल सोबतच्या डबकीत गोळा करीत असल्याची माहिती आरोपीनी पोलिसांना दिली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस कन्हान परिसरात देखील अशाच घटना घडल्या होत्या यात आरोपीचा सहभाग आहे की नाही याची तपासणी पोलीस करीत आहेत.