रेल्वेगाड्यांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, १३ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 09:49 PM2017-11-20T21:49:25+5:302017-11-20T21:55:48+5:30
झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने जयपूर-चेन्नई एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांचे दागिने, कपडे असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने जयपूर-चेन्नई एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांचे दागिने, कपडे असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वेगाडी क्रमांक १२९६८ जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये ज्योती श्रीनाथ डागा (२९) रा. संगमनेर, जयपूर या कोच क्रमांक ए-२, बर्थ ६ वरून मुलीसोबत प्रवास करीत होत्या. रात्री ९.४५ ते १२ दरम्यान त्या झोपी गेल्यानंतर इटारसी ते बैतूल स्थानकादरम्यान अज्ञात आरोपीने त्यांच्या दोन ट्रॉलीबॅग पळविल्या. त्यात डायमंड, सोन्याचे दागिने, कपडे असा एकूण १० लाख २१ हजाराचा मुद्देमाल होता. झोपेतून उठल्यानंतर त्यांना ट्रॉलीबॅग चोरीला गेल्याचे समजले. नागपूर रेल्वेस्थानक आल्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. दुसऱ्या घटनेत अनिता राजेंदर मिया(५७)रा. पंजाब या रेल्वेगाडी क्रमांक १२४४२ निजामुद्दीन-बिलासपूर राजधानी एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक बी-९, बर्थ ४१, ४४ वरून आपल्या पतीसह निजामुद्दीन ते रायपूर असा प्रवास करीत होत्या. पहाटे ४ वाजता त्या झोपेत असताना अज्ञात आरोपीने त्यांची पर्स उघडून त्यातील सोन्याचे २ लाख ८० हजार रुपये किमतीचे दागिने पळविले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
........