नागपुरात गँगवॉर, पवन हिरणवारची हत्या, शेखूने घेतला भावाच्या हत्येचा बदला? : खापरखेडा पाेलिसांत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:45 IST2025-01-03T12:45:13+5:302025-01-03T12:45:27+5:30
ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील बाभूळखेडा-चिचाेली (ता. कामठी) शिवारात गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

नागपुरात गँगवॉर, पवन हिरणवारची हत्या, शेखूने घेतला भावाच्या हत्येचा बदला? : खापरखेडा पाेलिसांत गुन्हा
नागपूर/खापरखेडा : नागपूर शहरातील पाच गुंड कारने देवदर्शन करून परत येत असताना दुचाकीने आलेल्या दाेन गुंडांनी त्यांना वाटेत अडविले. कारमधील एक गुंड खाली उतरताच दुचाकीवरील दाेघांपैकी एकाने त्यांच्यावर देशीकट्ट्यातून गाेळ्या झाडल्या. यात गँगस्टरचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. गाेळीबार हाेताच कारमधील इतरांनी शेतात पळ काढला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील बाभूळखेडा-चिचाेली (ता. कामठी) शिवारात गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
पवन धीरज हिरणवार (वय २८, रा. काचीपुरा, नागपूर) असे मृताचे, शैलेश ऊर्फ बंटी हिरणवार (३१) असे जखमीचे नाव आहे. या दाेघांसह हिमांशू गजभिये, साेनू शेंद्रे व सिद्धार्थ काेवे हे पाचजण कारने बाभूळखेडा येथील पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शनाला गेले हाेते. परतीच्या प्रवासात माेटारसायकलवरून आलेल्या दाेघांनी देशीकट्टा दाखवून त्यांची कार अडवली.
पवन खाली उतरताच दाेघांपैकी एकाने त्याच्यावर गाेळ्या झाडल्या. दाेन गाेळ्या डाेक्यात व एक छातीत शिरल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बंटीच्या कानाजवळ गाेळी लागल्याने ताे गंभीर जखमी झाला. त्याला नागपुरातील मेयाे हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. गाेळीबार हाेताच कारमधील अन्य तिघे लगतच्या शेतात पळून गेले. पवनच्या मृतदेहाचे पाेस्टमार्टेम मेयाे हाॅस्पिटलमध्ये करण्यात आले. खापरखेडा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
दाेन गँगस्टरमधील वाद टोकाला
शेखू खान हा अंबाझरी नागपूर, तर परवेज खान हा माेमीनपुरा नागपूर येथील गँगस्टर आहे. दाेघेही साेबत काम करतात. पवन हा काचीपुरा, नागपूर येथील हिरणवार गँगचा प्रमुख हाेता. शेखू व पवन या दाेघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. पवन व त्याचा साथीदार परवेश गुप्ता, रा. पांढराबाेडी, नागपूर या दाेघांनी वर्षभरापूर्वी शेखूचा भाऊ सराेज खान याची शंकरनगर नागपूर येथे चाकूने वार करून हत्या केली हाेती. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शेखूने हा हल्ला केल्याची शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली आहे.