स्लममधील विद्यार्थ्यांच्या दारात शिक्षणाची गंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:09 AM2021-08-19T04:09:33+5:302021-08-19T04:09:33+5:30
नूतन भारत शाळेचा मोबाइल स्कूल उपक्रम : वस्त्यावस्त्यांमध्ये भरताहेत वर्ग नागपूर : कोरोना महामारीमुळे शाळाच बंद असल्याने विद्यार्थ्यांचे ...
नूतन भारत शाळेचा मोबाइल स्कूल उपक्रम : वस्त्यावस्त्यांमध्ये भरताहेत वर्ग
नागपूर : कोरोना महामारीमुळे शाळाच बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुटल्यासारखे झाले आहे. ऑनलाइनद्वारे वर्ग घेण्याचा काहीसा तोटका प्रयत्न काही शाळांकडून केला जातोय. पण गरीब विद्यार्थी ऑनलाइन वर्गापासून दूरच आहेत. ही बाब अभ्यंकरनगरातील नूतन भारत विद्यालयाच्या लक्षात आली. त्यांनी मोबाइल शाळा उपक्रमाद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या दारात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविली. आता घराशेजारीच भरणाऱ्या मोबाइल शाळेमुळे हे विद्यार्थी परत शिक्षणाच्या प्रवाहात आले आहे.
शहरातील गणेशनगर, नारायणनगर, भीमनगर, वैशालीनगर, जयताळा, एकात्मतानगरात दररोज सकाळी ८.३० ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान रस्त्यावर, झाडाच्या खाली नियमित शाळा भरत आहे. शाळा बंद असल्याने स्लम भागातील आठव्या, नवव्या वर्गातील मुली ह्या आईबरोबर घरकाम करायला लागल्या होत्या. मुले आजूबाजूच्या दुकानात काम करायला लागले होते. ते शिक्षणापासून दूर जात असल्याचे शाळेच्या लक्षात आले. त्यामुळे शाळेने त्यांच्या घराशेजारीच वर्ग सुरू केले. या वस्त्यांमध्ये शाळेचे दोन शिक्षक सकाळी जातात. एक शिक्षक प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना दुसरे शिक्षक माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना शिकवितात. कोरोनाचे नियम पाळून दररोज सकाळी तीन तास शाळा नियमित भरत आहे. नूतन भारत विद्यालयाचेच नाही तर स्लम भागातील शेकडो विद्यार्थी शाळा आपल्या दारी या उपक्रमात सहभागी होत आहे.
- पालकही करत आहेत सहकार्य
४ जुलैपासून शाळा सुरू झाली. विद्यार्थीही आता नियमित येऊ लागले आहे. पाऊस आला तर पालकच आम्हाला वर्ग भरविण्यास सहकार्य करतात. पालकांनी स्वत:चे घर, शेड, हॉल उपलब्ध करून दिले आहे. ही शाळा बंद करू नका, असा पालकांकडूनच आग्रह होत असल्याचे शिक्षक सांगतात.
- शाळांनी अशा उपक्रमाचा बोध घेण्याची गरज
कोरोनाकाळात शिक्षण ऑनलाइन की ऑफलाइन, परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, निकालाचे सूत्र काय, यावर भरपूर वाद प्रतिवाद झाले. परंतु विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचत आहे की नाही, विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा विचार कुणी केलेला नाही. परंतु या मोबाइल स्कूलमुळे खऱ्या गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचाविण्यास मदत होत आहे. मोठ्या शाळांनीही अशा उपक्रमाचा बोध घेऊन सामाजिक दायित्व पार पाडण्याची गरज आहे.
- गरीब विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षणाबद्दलची मर्यादा आणि अडचणी लक्षात घेत, आम्ही हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा शेकडो गरीब विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे.
वंदना बडवाईक, प्राचार्य, नूतन भारत विद्यालय