गंगा नदी सकारात्मक उर्जेचा स्रोत : अर्जुन मेघवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:20 AM2018-02-15T00:20:36+5:302018-02-15T00:23:12+5:30
जगभरात अनेक नद्या वाहतात. मात्र गंगा नदीतील पाण्याचे गुण इतर ठिकाणी आढळून येत नाहीत. गंगा नदीच्या पाण्यात ‘ब्रह्मतत्त्व’ आहे की नाही, यावर संशोधन सुरू आहे. मात्र ‘नीरी’तसेच आणखी काही संस्थांच्या प्राथमिक अहवालातून गंगा नदीच्या पाण्यात सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असल्याची बाब समोर आली आहे, अशी माहिती जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरात अनेक नद्या वाहतात. मात्र गंगा नदीतील पाण्याचे गुण इतर ठिकाणी आढळून येत नाहीत. गंगा नदीच्या पाण्यात ‘ब्रह्मतत्त्व’ आहे की नाही, यावर संशोधन सुरू आहे. मात्र ‘नीरी’तसेच आणखी काही संस्थांच्या प्राथमिक अहवालातून गंगा नदीच्या पाण्यात सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असल्याची बाब समोर आली आहे, अशी माहिती जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिली. १६ फेब्रुवारीपासून मंत्रालयाच्या पुढाकाराने शहरात ‘भूजल मंथन’चे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधी पत्रपरिषदेदरम्यान माहिती देताना ते बोलत होते.
गंगा नदीच्या स्वच्छतेसंदर्भात केंद्र सरकार गंभीर असून ‘नमामि गंगे’ प्रकल्पावर आतापर्यंत १४१२७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यानुसार गंगा नदीच्या किनाºयावर असलेल्या शहरांसाठी एकूण ९७ ‘एसटीपी’ (सिव्हेज ट्रीटमेन्ट प्लॅन्ट) प्रकल्पांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय इतर प्रकल्प मिळून ही संख्या १८७ असून यातील ४७ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पहिल्या टप्प्याचे काम जोरात सुरू असून मार्चअखेर उर्वरित प्रकल्पांची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण होईल. गंगा नदीच्या किनाºयावर अनेक ठिकाणी औषधी वनस्पती आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात ‘बॅक्टेरिआ’चे प्रमाण कमी दिसून येते, असेदेखील अर्जुन मेघवाल यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय भूमी जल बोर्डाचे अध्यक्ष के.सी.नाईक, सुधीर दिवे प्रामुख्याने उपस्थित होते.
गडकरींमुळे ‘नमामि गंगे’ला गती
गंगा स्वच्छता करण्यावर आमचा भर असून या विभागाच्या माजी मंत्री उमा भारती यांच्या कार्यकाळात अनेक नव्या गोष्टींना सुरुवात झाली. त्यांचे काम अतिशय चांगले होतेच, मात्र नितीन गडकरी यांच्याकडे ही जबाबदारी आल्यानंतर त्यांनी कामाचा धडाकाच लावला आहे. त्यांच्यामुळे ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन अर्जुन मेघवाल यांनी केले.