गंगाजमुनाचे समर्थक-विरोधक आमने-सामने, आंदोलकांचा राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:10 AM2021-08-23T04:10:09+5:302021-08-23T04:10:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राखी पौर्णिमेच्या पर्वावर गंगाजमुना येथील वारांगणांचे समर्थक व विरोधक एकमेकांपुढे उभे झाले. यावेळी दोन्ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राखी पौर्णिमेच्या पर्वावर गंगाजमुना येथील वारांगणांचे समर्थक व विरोधक एकमेकांपुढे उभे झाले. यावेळी दोन्ही गटाच्या आंदोलकांनी एकमेकांविरोधात घोषणा देत वातावरण तापवून सोडले.
राष्ट्रवादीच्या नेत्या व गंगाजमुना बचाव समितीच्या ज्वाला धोटे गंगाजमुना येथील वारांगणांना भेटण्यास येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांच्या गंगा जमुना वेश्या व्यवसाय हटाव कृती समितीने रविवारी आंदोलन उभारले. स्थानिकांचे नेतृत्त्व राष्ट्रवादी पक्षाच्या महापालिकेतील नगरसेविका आभा पांडे यांनी केल्याने एकाच पक्षाच्या दोन महिला नेत्या एकमेकींसमाेर उभ्या झाल्या होत्या. याचे पर्यवसान एकमेकांविरोधात घोषणा देण्यावर झाल्याने परिसरातील वातावरण प्रचंड तापले होते. ९ ऑगस्टपासून गंगाजमुना ही वस्ती हटविण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. येथील अवैध धंदे, दारूची दुकाने, कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्यता व गुन्हेगारीला असलेले पोषक वातावरण दूर करण्यासाठी ही कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या भागातील वारांगणांच्या पुनर्वसनाची कुठलीच योजना जाहीर न करता शासनाने हा निर्णय घेतलाच कसा? असा सवाल उपस्थित करत या महिलांना येथून हटवू देणार नाही, अशी भूमिका गंगाजमुना बचाव समितीने घेतली. त्याच पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी समितीच्या ज्वाला धोटे रविवारी गंगाजमुनात दाखल झाल्या. मात्र, येथील वेश्या व्यवसायाचा आणि त्यायोगे गुन्हेगारी जगताचा नेहमीच सामना करावा लागत असलेले नागरिक आक्रमण झाले. त्याअनुषंगाने गंगा जमुना वेश्या व्यवसाय हटाव कृती समितीने रविवारी आंदोलन पुकारले. या आंदोलनाचे नेतृत्व आभा पांडे यांच्यासह मनोज चाफले, विपीन जैन, रवी गुडपल्लीवार, पुष्पा वाघमारे, मधुकर फुकट, सिराज खान यांनी केले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही बाजूचे आंदोलक शांत झाले. त्यानंतर या परिसरात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
------------------
जागेवर बिल्डर्सचा डोळा असल्याची चर्चा
सुमारे दहा एकरांत पसरलेली व कोट्यवधी रुपये किमतीची ही वस्ती इतवारी या घाऊक बाजाराला लागूनच असल्याने या बाजाराच्या विस्तारीकरणासाठी तिच्यावर अनेक बिल्डर्सचा डोळा असल्याची चर्चा जोरात आहे. त्याच पार्श्वभूमीवर गंगाजमुना वस्तीवर कारवाई केली जात असल्याचे बोलले जात आहे.
............