कॉल सेंटरमधील तरुणीवर सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये तीन तरुणींचाही समावेश, दोघींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 08:18 AM2017-09-24T08:18:02+5:302017-09-24T08:18:25+5:30
शीतपेयात गुंगीचे औषध देऊन दोन ते चार जणांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. विशेष म्हणजे, सामूहिक बलात्काराच्या या घृणित गुन्ह्यात पीडित तरुणीच्या मैत्रिणीदेखील आरोपी आहेत.
नागपूर, दि. 24 - शीतपेयात गुंगीचे औषध देऊन दोन ते चार जणांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. विशेष म्हणजे, सामूहिक बलात्काराच्या या घृणित गुन्ह्यात पीडित तरुणीच्या मैत्रिणीदेखील आरोपी आहेत.
पीडित तरुणी (वय २१) एका कॉल सेंटरमध्ये काम करते. तेथेच काम करणा-या सुप्रिया पाटील (रा. उदयनगर) सोबत तसेच कॅटरर्समध्ये काम करणाºया लीना ऊर्फ श्रेया धांदेसोबत तिची मैत्री होती. सुप्रिया आणि लीनाची एक मैत्रिण मानकापूरला सदनिकेत राहते. १० सप्टेंबरला दुपारी १२.३० वाजता सुप्रिया आणि लीनाने पीडित मुलीला उदयनगरातून मानकापूरला मैत्रिणीच्या सदनिकेत नेले. तेथे एक अनोळखी व्यक्ती होती. पीडित तरुणीला आरोपींनी शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. तिची शुद्ध हरपल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत दोन ते चार आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती शुद्धीवर आल्यानंतर तिला असह्य वेदना होऊ लागल्या. शुद्धीवर आल्यानंतर तिने याबाबत मैत्रिणींना जाब विचारला असता त्यांनी तिला बदनामीचा धाक दाखवून गप्प बसण्याचा सल्ला दिला.
पुन्हा पुन्हा कॉल
बदनामीच्या धाकाने पीडित तरुणी गप्प बसल्यानंतर आरोपी तिला वारंवार तेथे येण्यासाठी फोन करू लागले. त्यांचा त्रास वाढत चालल्यामुळे पीडित तरुणी शनिवारी दुपारी हुडकेश्वर ठाण्यात पोहचली. तिने तेथे सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवली. सहायक निरीक्षक प्रवीण आवटे यांनी तीन तरुणींसह चार आरोपींविरुध्द सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी धावपळ करून सुप्रिया आणि लीनाला अटक केली. प्राथमिक तपासात या तरुणीवर अनेकांनी बलात्कार केल्याचा संशय बळावला आहे. पोलीस या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
हुडकेश्वरमध्ये खळबळ
हुडकेश्वर परिसरात महिनाभराच्या कालावधीत घडलेला सामूहिक बलात्काराचा दुसरा गुन्हा होय. अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याचा गुन्हा तीन आठवड्यांपूर्वी घडला होता. पीडित मुलीला तेथील ठाणेदार सुनील झावरे यांनी मारहाण केल्याने हे प्रकरण चांगलेच वादग्रस्त झाले होते. त्याची चौकशी पोलीस उपायुक्तांकडून करण्यात येत असल्याचे वरिष्ठांनी सांगितले होते. मात्र, या चौकशी अहवालाच्या संबंधाने उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.