दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
By Admin | Published: August 3, 2016 02:25 AM2016-08-03T02:25:57+5:302016-08-03T02:25:57+5:30
दरोड्याच्या तयारीत निघालेल्या अट्टल गुन्हेगारांच्या एका टोळीला सोनेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री शिताफीने अटक केली.
घातक शस्त्रे जप्त : सोनेगाव पोलिसांची कामगिरी
नागपूर : दरोड्याच्या तयारीत निघालेल्या अट्टल गुन्हेगारांच्या एका टोळीला सोनेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्रे आणि दरोड्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. या गुन्हेगारांकडून अनेक गुन्ह्यांचा तपास लागू शकतो, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांना दिली.
सोनेगाव ठाण्यात कार्यरत असलेले हर्षल पाटमासे (वय ३०) यांना सोमवारी रात्री एका खबऱ्याने टीप दिली. अॉटो आणि मोटरसायकलवर जमलेले गुन्हेगार सोनेगाव ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असल्याचे समजल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी ठाणेदार अशोक बागूल यांना कळविले. त्यानंतर ठाणेदार बागूल, एपीआय पगार, हवालदार सुभाष, नायक मारोती, शिपाई मनीष, संदीप, हिमांशू, हर्षल, सुभाष, राकेश यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून आरोपी पळू लागले. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून आरोपी प्रवीण रामगोपाल मीना (वय २४, रा. कुशीनगर), रवी दिलीप ठाकरे (वय २१, रा. वैशालीनगर), राजेंद्र रामप्रसाद लांजेवार (वय १९, रा. जयहिंद सोसायटी श्यामनगर), राहुल ऊर्फ विशाल श्यामचंद्र रॉय (वय १८, रा.कैकाडीनगर), प्रतीक रमेश गिरी (वय १८, रा. श्यामनगर महाजनचक्कीजवळ मनीषनगर) आणि शंकर कवडुजी कुंभरे (वय २८, रा. बालाजी मंदिरमागे बेसा टी पॉर्इंट) या आरोपींना पकडले. त्यात पुन्हा एका अल्पवयीन साथीदाराचा समावेश आहे. त्यांच्यावर विविध ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून तीन धारदार लोखंडी कोयते, नायलॉनची दोरी, मिरची पावडर, तीन मोबाईल, हॉकी स्टीक तसेच एक अॅक्टिव्हा असा एकूण ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कामगिरीसाठी सोनेगाव पोलिसांना २० हजारांचा रिवॉर्ड देण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त मासिरकर यांनी सांगितले. यावेळी ठाणेदार अशोक बागूल उपस्थित होते. (प्रतिनिधी)