गँगस्टर कोत्तुलवारला मकोकाअंतर्गत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:09 AM2021-05-20T04:09:33+5:302021-05-20T04:09:33+5:30
मनीष श्रीवास हत्याकांडात सफेलकर टोळीला मदत करणारा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनीष श्रीवास हत्याकांडात सफेलकर टोळीला मदत करणारा ...
मनीष श्रीवास हत्याकांडात सफेलकर टोळीला मदत करणारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनीष श्रीवास हत्याकांडात सफेलकर टोळीला मदत करणारा कुख्यात गुंड दिवाकर कोत्तुलवार याला मकोकाअंतर्गत अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने बुधवारी त्याला अटक केली.
मनीष श्रीवास हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत रणजित सफेलकर, कालू हाटे, त्याचा भाऊ भरत हाटे, हेमलाल ऊर्फ हेमंत नेपाली, छाेटू बागडे, श्रीनिवास ऊर्फ सीनू अन्ना, विशाल ऊर्फ इसाक मस्ते आणि विनय कुमार ऊर्फ गोलू बाथव यांना अटक केली आहे. मनीषच्या खुनानंतर कोत्तुलवार टोळीने १२ मार्च २०१२ रोजी एमआयडीसी येथील मोंटू भुल्लर याची हत्या केली होती. दिवाकर हा सफेलकर टोळीशी जुळलेला होता. श्रीवासच्या हत्येपासूनच सफेलकर टोळीचे नाव चर्चेत होते. सफेलकर टोळीची मदत करण्याच्या उद्देशानेच दिवाकरने मोंटीच्या खुनात मनीष श्रीवासचा हात असल्याची खोटी माहिती दिली होती. त्याने या खुनात त्याच्यासह त्याचा भाऊ आशिष कोत्तुलवार, कपिल सिंह, नितीन वाघमारे, सुचिंद्र रामटेके, राहुल दुबे आणि कार्तिक तेवर यांचा सहभाग असल्याचे सांगितले होते. दिवाकरच्या बयानावरून पोलिसांना मनीष श्रीवास जिवंत असल्याचे वाटले. त्याचा मृतदेहसुद्धा सापडला नव्हता. परंतु लोकमतने हा खोटारडेपणा उघडकीस आणला होता.
मोंटीच्या हत्येच्या सात दिवसापूर्वीच म्हणजे ५ मे २०१२ रोजी श्रीवासचा खून करून त्याचा मृतदेह कुरईच्या जंगलात फेकण्यात आला होता. सफेलकर टोळीला विचारपूस करताना ही बाब उघडकीसही आली आहे. गुन्हे शाखेच्या तपासातही ही बाब आढळून आली. यामुळे दिवाकरने श्रीवासची हत्या लपविण्यासाठीच पोलिसांची दिशाभूल केल्याची बाब उघड होते. दिवाकर हा खंडणी वसुली आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अगोदरही तुरुंगात होता. त्याला प्रॉडक्शन वाॅरंटअंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. मकोकाअंतर्गत अटक करून त्याला विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २५ मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. दिवाकरवर मकोकाची ही तिसरी कारवाई आहे.