नागपूरचा गँगस्टर राजू भद्रे नाशिक पोलिसांसमोर हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 08:19 PM2019-07-27T20:19:47+5:302019-07-27T20:21:11+5:30
उपराजधानीतील खतरनाक गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या राजू भद्रे याने अखेर नाशिकला जाऊन स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. तेथे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आज सायंकाळपासून गुन्हेगारी वर्तुळात पसरले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील खतरनाक गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या राजू भद्रे याने अखेर नाशिकला जाऊन स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. तेथे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आज सायंकाळपासून गुन्हेगारी वर्तुळात पसरले होते.
बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांडात भद्रेला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तो स्थानिक गुन्हेगारांचा म्होरक्या असल्यामुळे त्याला येथून नाशिक कारागृहात हलविण्यात आले होते. तेथे त्याला चार दिवसांची संचित रजा मिळाली होती. मात्र त्याला नाशिकबाहेर जाण्यास परवानगी नव्हती. असे असताना भद्रे नागपुरात आला होता. त्याने बेसा परिसरात एका फार्म हाऊसवर पार्टी केल्याचे पोलिसांना कळताच गुन्हे शाखा पोलीस त्याच्या मागे लागले. फार्म हाऊस आणि घरी धडक देऊन पोलिसांनी भद्रेची शोधाशोध केली. ते लक्षात आल्याने भद्रे सरळ नाशिकला पोहचला. तो आज त्र्यंबकेश्वर पोलिसांसमोर हजर झाला. त्यानंतर काही वेळेतच भद्रेला हृदयविकाराचा धक्का आल्याचे वृत्त गुन्हेगारी वर्तुळात चर्चेला आले. दरम्यान, भद्रे नागपुरात आल्यानंतर आणि येथून पुण्याला गेल्याचे कळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधण्यासाठी पुणे, नाशिकपर्यंत धाव घेतली होती. ते कळल्यामुळेच भद्रे नाशिकला पोहचला आणि पोलिसांसमोर हजर झाला असावा, अशी शंका गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे यांनी यासंबंधाने बोलताना व्यक्त केली.