नागपुरातील रामबागमध्ये गँगवॉर : नागरिक दहशतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 09:44 PM2020-09-18T21:44:45+5:302020-09-18T21:46:09+5:30
इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबागमध्ये गुंडांच्या दोन टोळ्यांमधील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले चढविणे सुरू केले आहे. त्यामुळे कोणत्याही दिवशी येथे मोठा गुन्हा घडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हे गुंड निरपराध नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबागमध्ये गुंडांच्या दोन टोळ्यांमधील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले चढविणे सुरू केले आहे. त्यामुळे कोणत्याही दिवशी येथे मोठा गुन्हा घडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हे गुंड निरपराध नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
रामबाग मैत्री बुद्धविहाराजवळ राहणारा कुख्यात गुंड भिकू राजा परचाके याने चार दिवसांपूर्वी त्याचा प्रतिस्पर्धी गुंड पलाश वासनिक याच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला होता. त्यावेळी पलाश वाचला. दुसऱ्या दिवशी परचाकेच्या गुंडांनी पुन्हा हैदोस घातला. त्याचा बदला घेण्यासाठी कुख्यात पलाश वासनिक, सनी चव्हाण, विकी दाभाडे आणि त्याच्या सशस्त्र साथीदारांनी बुधवारी मध्यरात्री भिकू परचाकेच्या घरावर हल्ला चढवला. त्याच्या घराचे दार तोडून भिकूला मारण्याचा प्रयत्न केला. भिकूची पत्नी उषा परचाके पुढे आली असता आरोपीने तिच्या अंगावरून तलवार फिरवून तिला मारण्याचा प्रयत्न केला. यात ती जखमी झाली. तीन दिवसांपासून एकमेकांच्या घरावर हे गुंड हल्ले चढवत असल्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी येथे बंदोबस्तही लावला आहे; मात्र त्याला न जुमानता गुंडांच्या या दोन्ही टोळ्या एकमेकांना धडा शिकविण्याच्या प्रयत्नात दहशत निर्माण करीत आहे. दरम्यान, उषा परचाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपी पलाश वासनिक याच्या तीन साथीदारांना अटक केली. पलाश मात्र फरार झाला. तर त्यापूर्वीच्या गुन्ह्यात आरोपी भिकू परचाके याचे ७ गुंड साथीदार पोलिसांच्या अटकेत आहेत. भिकू मात्र फरार आहे.
तोडफोड, नुकसान भरपाई कोण देणार?
तलाश आणि त्याच्या गुंड साथीदारांनी परिसरातील २० वाहनांची तोडफोड केली. गुंडांच्या टोळ्या आपला राग निरपराध नागरिकांच्या वाहनावर काढत असल्यामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे. हे नुकसान कोण भरून देणार, असा प्रश्न नुकसानग्रस्त वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.