नागपूर कारागृहात परत गांजा; कैद्याच्या ताब्यातून गांजाच्या पुड्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 01:35 PM2023-11-07T13:35:53+5:302023-11-07T13:46:10+5:30
कारागृहातील अधिकारी झोपेतच : एकीकडे प्रकाशपेरणीचा दावा अन् दुसरीकडे गांजाची ने-आण सुरूच
योगेश पांडे
नागपूर : मागील वर्षी नागपूर मध्यवर्ती कारागृहात गांजा आढळल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते व तत्कालीन अधिकाऱ्यांवर बरीच टीका झाली होती. मात्र नवीन अधीक्षकांच्या कार्यकाळातदेखील स्थिती जैसे थे असल्याचेच चित्र आहे. कारागृहात दोन दिवसांअगोदर एका कैद्याच्या ताब्यातून गांजाच्या पुड्या जप्त करण्यात आल्या. त्याने गुदद्वारात लपवून बाहेरून गांजा आत आणला आणि त्यानंतर ‘अंडरविअर’मध्ये सेलोेटेपच्या साहाय्याने पुड्या लपवून ठेवल्या होत्या. यातून कारागृहातील कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता कैद्यांची झडती घेण्यात आली. बडी गोल बॅरेक क्रमांक एकमध्ये झडती सुरू असताना न्यायाधीन कैदी अतुल केवळराम शेंडे याची हालचाल संशयास्पद वाटली. त्यावरून तैनात कर्मचाऱ्याने त्याची तपासणी केली असता अंडरविअरच्या आत जांघेमध्ये काहीतरी लपविल्याचे दिसून आले. शेंडेने त्याच्या जांघेला सात प्लॅस्टिकच्या पुड्या सेलोटेपने घट्ट गुंडाळल्या होत्या. पुड्या उघडून पाहिल्या असता त्यात सुमारे १०० ग्रॅम गांजा आढळला. त्याला गांजा कुठून आला याची विचारणा केली असता त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. पुड्यांचा रंग लालसर वाटत होता. त्यामुळे त्याला कडक भाषेत विचारणा केल्यावर त्याने गुदद्वारातून एक पुडी काढून दिली. तत्काळ धंतोली पोलिस ठाण्याला याची माहिती देण्यात आली. तेथील ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्या पथकाने संबंधित गांजा ताब्यात घेतला. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून आरोपी शेंडेविरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या शौचालयात मिळाला गांजा
आरोपी शेंडे याला शनिवारी जिल्हा न्यायालयात नेण्यात आले होते. तेथे तो कारण सांगून शौचालयात गेला व तेथे त्याच्या मित्राने त्याला प्लॅस्टिकच्या पुड्यांमध्ये गांजा दिला. तेथून तो गांजा त्याने गुदद्वारात लपवून आणला व त्यानंतर कारागृहात तो बाहेर काढून सेलोटेपच्या मदतीने जांघेत लपविला. याअगोदरदेखील कैद्यांकडून अशाच ‘मोडस ऑपरेंडी’चा उपयोग करण्यात आला असतानादेखील कारागृह प्रशासनाकडून त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
कारागृहात चालले तरी काय?
नागपूर मध्यवर्ती कारागृह हे मागील महिन्यातदेखील चर्चेत आले होते. पंधरा दिवसांत दोनदा कारागृहात कैद्यांच्या गटांमध्ये राडा झाला. एका कैद्याने तर कारवाईपासून वाचण्यासाठी अधिकाऱ्यांसमोर डोके आपटून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कारागृहातील कार्यप्रणालीवर वारंवार प्रश्न उपस्थित होत असतानादेखील अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.