दक्षिण एक्स्प्रेसमधून गांजाची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:26 AM2017-10-28T01:26:12+5:302017-10-28T01:26:45+5:30
रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने दक्षिण एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून २ लाख १२ हजार २८० रुपये किमतीचा २१ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने दक्षिण एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून २ लाख १२ हजार २८० रुपये किमतीचा २१ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्याच्या उद्देशाने गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक अरुण ठवरे आणि सहकारी रेल्वेगाडी क्रमांक १२७२१ दक्षिण एक्स्प्रेसमध्ये सेवाग्राम रेल्वेस्थानकावरून गस्त घालत होते. दरम्यान सिंदी ते नागपूर दरम्यान त्यांना ए १ या वातानुकूलित कोचमध्ये बर्थ क्रमांक ३५, ३६ खाली दोन बेवारस बॅग आढळल्या. आजूबाजूच्या प्रवाशांना त्याबाबत विचारणा केली असता त्या बॅगवर कुणीही आपला हक्क सांगितला नाही. याची सूचना अरुण ठवरे यांनी त्वरित नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, नागपूर ठाण्याचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक कृष्णा नंद राय यांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वान रेक्सने दोन्ही बॅगची तपासणी केली असता त्यात मादक पदार्थ असल्याचा संकेत दिला. दोन्ही बॅग गाडीखाली उतरून तपासणी केली असता त्यात २ लाख १२ हजार २८० रुपये किमतीचा २१ किलो २२० ग्रॅम गांजा आढळला. कागदोपत्री कारवाई करून जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.