Vidhan Sabha Election 2019; निवडणूक रिंगणात नेत्यांचाही रंगणार गरबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:28 AM2019-09-23T11:28:30+5:302019-09-23T11:29:41+5:30
जनसंपर्कासाठी मिळालेल्या या काळाचा अधिकाधिक फायदा कसा करून घ्यायचा, या नियोजनात गुंतलेले संभाव्य उमेदवार फेस्टिव्हल कनेक्टचा फंडा वापरत असल्याचे दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुका आल्या की उमेदवारांना मतदारांविषयी भारीच प्रेम उफाळून येते. त्यातल्यात्यात संस्था, कॉलनी, संघटित युवा मंडळ, क्रिकेटसारखे क्लब, सण-उत्सवात तर आलेल्या प्रेमाचे भरते काही विचारू च नका! विधानसभा निवडणुक ांच्या तारखा घोषित झाल्या आहेत. मोजून महिनाभराने निवडणुका आहेत. जनसंपर्कासाठी मिळालेल्या या काळाचा अधिकाधिक फायदा कसा करून घ्यायचा, या नियोजनात गुंतलेले संभाव्य उमेदवार फेस्टिव्हल कनेक्टचा फंडा वापरत असल्याचे दिसत आहे.
सध्या मस्कऱ्या गणपतीचे दिवस सुरू आहेत. देवापुढे कधी हात न जोडणारेही आता मस्कºया गणपतीच्या मंडपात जाऊन कार्यकर्त्यांना काय हवं-नको विचारत आहेत. पुढच्या आठवड्यातच नवरात्रोत्सव सुरू होत आहे. एरवी असे सण-उत्सवांचे दिवस आले की हीच नेतेमंडळी फ्लॅक्स-होर्डिंगवर दणदणीत शुभेच्छा देऊन मोकळी होत असत. आता आचारसंहिता लागल्याने बॅनर जप्त होण्याची शक्यता असल्याने गावागावातील, कॉलनीतील महिला मंडळे, महिला बचत गटांसोबत नेत्यांचा संपर्क वाढायला लागला आहे. नेत्यांच्या कुटुंबातील महिलावर्गही खेड्यापाड्यात पोहचून महिलांसोबत संपर्क वाढविताना दिसत आहे.
नागपुरात अद्याप कुण्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर झालेले नाहीत. तिकिटासाठी स्पर्धा एवढी आहे की आपल्यालाच तिकीट मिळेल, याचीही कुणाला हमी नाही. तरीही उद्या अडचण नको म्हणून मैदानातील सरावासाठी सारेच उतरले आहेत. अद्याप तिकीट हाती आले नसले तरी संभाव्य उमेदवारांनी प्रचाराची ‘ब्ल्यूप्रिंट’ तयार क रून ठेवली आहे. पारंपरिक तसेच ‘हायटेक’ प्रचारासोबतच पुढील महिनाभरात येणाºया सणांच्या माध्यमातून मतदारांशी ‘कनेक्ट’ कसे होता येईल, यावर सर्वांचा भर दिसत आहे.
तसेही अनेक जण गणेशोत्सवापासूनच ‘आॅफ द रेकॉर्ड’ प्रचाराला लागले आहेत. पोस्टर्स, बॅनर्सच्या माध्यमातून अनेक उमेदवार नागपुरातील चौक ाचौकात झळकले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे इच्छुक उमेदवारांमध्ये यासाठी अहमहिका एवढी की एकाच पक्षातील दोन-तीन उमेदवारांच्या छब्या दिसायला लागल्याने मतदारही गंमत अनुभवत आहेत.
ऐन पितृपक्षात आचारसंहिता लागल्याने दोन दिवसानंतरही अद्याप निवडणुकीची हवा सुरू झालेली नाही. मात्र तिकीट मिळालेच तर, मोठ्या मंडळांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाच्या काळात मैदान कसे गाजवायचे आणि जनसंपर्काचा लाभ कसा उठवायचा, याचे प्लॅनिंग सर्वांनीच करून ठेवले आहे. सार्वजनिक दुर्गा-शारदा उत्सव मंडळे तसेच रास-गरबा व दांडियाचे माध्यम यासाठी महत्त्वाचे असल्याने सर्वांचा या नियोजनावर डोळा दिसत आहे.
या माध्यमातून मतदारांसोबत ‘सोशल कनेक्ट’ होण्यासाठी अनेक संभाव्य उमेदवारांनी आपली टीम तयार के ली असून जबाबदारीदेखील सोपविली आहे. ऐन प्रचाराच्या धामधुमीतच विजयादशी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन येत असल्याने हा इव्हेंट कोणत्याही परिस्थितीत सोडायचा नाही, यासाठी सर्वांचे जोरदार नियोजन दिसत आहे.
शहरातील सहाही मतदारसंघात निवडणूक प्रचाराचा रंग दिसून येणार आहे. सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळात उत्साह दिसून येत आहे. निवडणुकांमुळे नेत्यांचा उत्साह वाढल्याने भक्तगणही उत्साहात दिसत आहेत. संभाव्य उमेदवारांकडून यंदा किती वर्गणी घ्यायची, यावर मंडळाचे पदाधिकारी विचारमंथन करीत आहेत तर, कोणत्या मंडळाची ताकद किती, याचा अंदाज इच्छुक उमेदवार घेत आहेत. अंदाज आल्यावर अनेक ठिक ाणी तर पक्षाशी संबंधित उद्योजकांडून मोठ्या ‘स्पॉन्सरशिप’संदर्भात बोलणी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचीही माहिती आहे. या सर्व हालचालींच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव दणक्यात पार पडणार, असे दिसत आहे. नवरात्रोत्सवातील दांडियासोबत नेत्यांचाही गरबा निवडणुकीच्या रिंगणात रंगणार आहे.