‘कॅम्पस’मध्ये कचरा, ‘क्लासरुम्स’देखील काळवंडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:08 AM2021-09-03T04:08:01+5:302021-09-03T04:08:01+5:30

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘नॅक’च्या चमूच्या दौऱ्याला गुरुवारी सुरुवात झाली. चमूतील ...

Garbage in the 'campus', 'classrooms' also turned black | ‘कॅम्पस’मध्ये कचरा, ‘क्लासरुम्स’देखील काळवंडल्या

‘कॅम्पस’मध्ये कचरा, ‘क्लासरुम्स’देखील काळवंडल्या

Next

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘नॅक’च्या चमूच्या दौऱ्याला गुरुवारी सुरुवात झाली. चमूतील सदस्यांना विद्यापीठाने सगळे काही चकचकीत दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘नॅक’च्या चमूतील काही सदस्यांना ‘कॅम्पस’मधील मोकळ्या जागांवर जमलेल्या कचऱ्याचा ढीग, काळवंडलेल्या काही ‘स्मार्ट’ वर्गखोल्या यांचेदेखील दर्शन झाले. ‘नॅक’समोर जात असताना पुरेपूर तयारी का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘नॅक’च्या चमूने मानव्यशास्त्र इमारतीलादेखील भेट दिली. येथील एका बाह्य ‘स्मार्ट’ स्वरूप देण्यात आलेल्या वर्गखोलीतील छत व भिंत पाण्याच्या गळतीमुळे अक्षरश: काळवंडलेले होती. बऱ्याच ‘स्मार्ट क्लासरुम्स’ तर धुळीने माखलेल्या होत्या. काही विभागात तर बाहेरून रखरखाव चांगला होता, मात्र स्वच्छतागृहे, जिना यांची अवस्था वाईट होती. विद्यापीठाच्या प्रतिमेचा व श्रेणीचा प्रश्न असताना विद्यापीठाने या मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागपूर विद्यापीठात ४६ पदव्युत्तर विभाग आहेत. यातील बहुतांश विभाग अमरावती मार्गावर ‘कॅम्पस’मध्ये आहेत. एरवी पावसाळ्यात विभागामध्ये गवत व झुडपे वाढलेली असतात. ‘नॅक’च्या दौऱ्यासाठी विद्यापीठाने अनेक ठिकाणांवरील झुडपे कापली. परंतु मोकळ्या जागेतील कचऱ्याचे ढीग उचलण्याचे भान मात्र प्रशासनाला राहिलेच नाही. ‘नॅक’च्या चमूचे सदस्य विविध विभागांना भेटी देत असताना सहजतेने त्यांना या बाबी दिसून आल्या. रसायनशास्त्र विभाग, मानव्यशास्त्र विभागाजवळ कचऱ्याचे ढीग होते. नियमात बसत नसतानादेखील उघड्यावरच कचरादेखील जाळण्यात आला होता.

गट्टू नावापुरतेच लावले का?

‘नॅक’च्या तयारीसाठी विद्यापीठाकडे भरपूर वेळ होता. मात्र तरीदेखील ऐनवेळेला साफसफाई सुरू असल्याचे चित्र होते. अगदी चमू रसायनशास्त्र विभागात असताना वाचनालय तसेच आजूबाजूच्या परिसरात सफाई कामगार रस्त्याच्या कडेला साफसफाई करताना दिसून आले. रस्त्याच्या कडेला विद्यापीठाने गट्टू लावले आहेत. परंतु बऱ्याच ठिकाणचे गट्टू अक्षरश: उखडले असून, आजूबाजूला लावलेले सिमेंटदेखील निघाल्याचे चित्र आहे.

मैदान गवतामध्ये हरविले

‘नॅक’च्या निकषामध्ये ‘कॅम्पस’मधील क्रीडा सुविधांनादेखील महत्त्व आहे. ‘कॅम्पस’मध्ये जनसंवाद विभागाच्या मागील बाजूस एक मैदान आहे. परंतु तेथील गवत व झुडपांना काढण्याची तसदीदेखील विद्यापीठाने घेतली नाही. त्यामुळे मैदान हरविल्यासारखेच भासत होते.

‘कॅम्पस’मधील पायाभूत सुविधांची आकडेवारी

पदव्युत्तर विभाग - ४६

वर्गखोल्या - १४१

एकूण संगणक ६३३

आयसीटी सुविधा असलेल्या वर्गखोल्या - ९२

रुसाच्या निधीतून बनविलेल्या स्मार्ट वर्गखोल्या - २४

Web Title: Garbage in the 'campus', 'classrooms' also turned black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.