अर्ध्या नागपूर शहरातील कचरा संकलन ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 07:54 PM2020-06-15T19:54:39+5:302020-06-15T19:57:24+5:30
कामगार कपात, वेतन कपात, दर महिन्याला १५ ते २० दिवस काम देणे, वेतन वेळेवर न देणे, सकाळी कामावर बोलवल्यानंतर काम न देता दुपारच्या पाळीत कामावर बोलावणे यामुळे त्रस्त झालेल्या एजी एन्व्हायरो एजन्सीच्या १२०० कामगारांनी सोमवारी संप पुकारल्याने महापालिकेच्या एक ते पाच झोनमधील म्हणजेच अर्ध्या शहरातील कचरा संकलनाचे काम ठप्प झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामगार कपात, वेतन कपात, दर महिन्याला १५ ते २० दिवस काम देणे, वेतन वेळेवर न देणे, सकाळी कामावर बोलवल्यानंतर काम न देता दुपारच्या पाळीत कामावर बोलावणे यामुळे त्रस्त झालेल्या एजी एन्व्हायरो एजन्सीच्या १२०० कामगारांनी सोमवारी संप पुकारल्याने महापालिकेच्या एक ते पाच झोनमधील म्हणजेच अर्ध्या शहरातील कचरा संकलनाचे काम ठप्प झाले होते.
महापालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी दोन कंत्राटदार एजन्सी नियुक्त केलेल्या आहेत. यातील एजी एन्व्हायरो एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे कामगार त्रस्त झाले आहेत. गेल्या महिन्यातही दोन वेळा कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु त्यानंतरही कामगारांना न्याय मिळालेला नाही. यामुळे त्रस्त कामगारांनी वाठोडा येथील एजी एन्व्हायरो एजन्सीच्या कार्यालयापुढे धरणे दिले. संपामुळे पाच झोन क्षेत्रातील कचरा संकलन ठप्प झाले आहे.
दरम्यान, अमोल गायकवाड, गौरव मेश्राम, विश्वजीत तांबे आदींच्या नेतृत्वात सहायक कामगार आयुक्तांना निवेदन देण्यासाठी सिव्हिल लाईन्स परिसरात पोहचले असता सदर पोलिसांनी दहा कामगारांना ताब्यात घेतले. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. कामगार आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करीत असताना एजन्सीने दडपशाहीचे धोरण स्वीकारल्याने संप पुकारल्याची माहिती अमोल गायकवाड यांनी दिली.
दीड महिन्यात तिसऱ्यांदा आंदोलन
कामगार कपात व कमी वेतन देण्याच्या विरोधात कामगारांनी मे महिन्यात दोनदा आंदोलन केले. परंतु न्याय न मिळाल्याने संप पुकारल्याची माहिती कामगारांनी दिली. कोविड-१९ मध्ये जीवाची पर्वा न करता सफाई कर्मचारी काम करीत आहेत. परंतु एजन्सीकडून शोषण सुरू असल्याचा आरोप कामगारांनी केला. दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत संपावर तोडगा निघाला नव्हता. एजन्सीला यावर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिल्याची माहिती मनपाचे उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.