coronavirus; कचऱ्यामुळे आरोग्याला फास; आता बास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:23 PM2020-03-17T12:23:31+5:302020-03-17T12:26:08+5:30
नागपूर शहरात दररोज ११०० ते ११५० मेट्रिक टन कचरा निघतो. यासाठी आठ हजार कर्मचारी गोळा करण्यासाठी लागतात. त्यांच्यावर शंभराहून अधिक अधिकारी लक्ष ठेवतात. ५२५ लहान-मोठी वाहने हा कचरा वाहून नेतात, तरीही शहरात कचरा पडलेला असतोच.
गणेश हूड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कचऱ्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. कचऱ्यातील जंतू वातावरणात पसरून आजार निर्माण करतात. कचरा दुर्गंधी पसरवतो, सौंदर्य बिघडवतो. असे सगळे लहानपणापासून आपण शिकलेलो असतानाही कचरा तयार करायचा व तो कुठेही कसाही फेकून द्यायचा काही थांबायला तयार नाही. कोरोनासारख्या साथीच्या पार्श्वभूमीवर हे सगळे बंद होण्याची गरज आहे.
शहरात दररोज ११०० ते ११५० मेट्रिक टन कचरा निघतो. यासाठी आठ हजार कर्मचारी गोळा करण्यासाठी लागतात. त्यांच्यावर शंभराहून अधिक अधिकारी लक्ष ठेवतात. ५२५ लहान-मोठी वाहने हा कचरा वाहून नेतात, तरीही शहरात कचरा पडलेला असतोच.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका वर्षाला ७२ कोटी रुपये खर्च करते. तरीही कचरा रोज तयार होतच असतो व दुर्गंधी पसरवीत असतो. शहरातील कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे साठविला जातो. यातील १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्माण केले जाते. उर्वरित १००० ते १०५० मेट्रिक टन कचरा तसाच साठविला जातो. त्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. भांडेवाडी येथे साठून असलेल्या हजारो टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प हाती घेतला आहे. यावर काही कोटी खर्च येणार आहे. मनपाने स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहर कंटेनर मुक्त केले आहे. नवीन दोन कंपन्यांची कचरा संकलनासाठी नियुक्ती केली आहे.
नागरिकही तेवढेच दोषी...
इतका कचरा निर्माण होतोच कसा, या गहन प्रश्नासोबतच ‘तो कुठेही कसाही टाकला कसा जातो’? याची उकल मनपा प्रशासनाला होत नाही. याचे उत्तर त्यांच्या व्यवस्थेत दोष आहेतच. याचबरोबर नागरिकही तेवढेच दोषी आहेत, हेही तितकेच खरे. सार्वजनिक ठिकाणी मोकळी जागा दिसली की घरातील कचरा तेथे आणून टाकला जातो. कचरा तयार होणारच, हे समजल्यावर त्याची विल्हेवाटही व्यवस्थित लावायला हवी. हेही समजायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळेच महापालिकेने कितीही प्रयत्न केले तरीही कचºयाची समस्या काही संपायला तयार नाही.