नागपुरात मनपा शाळेसमोर ‘कचराघर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:30 AM2020-03-09T11:30:41+5:302020-03-09T11:32:07+5:30
झिंगाबाई टाकळी परिसरातील मनपाची शाळा या भागातील एकमेव शासकीय शाळा होती. एकेकाळी शिक्षणाचे पवित्र मंदिर असलेली ही शाळा दारुड्यांचा अड्डा झाल्याची धक्कादायक माहिती आहे.
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झिंगाबाई टाकळी, मानकापूर परिसरातील महापालिकेच्या शाळेने हजारो विद्यार्थी घडविले. आज हे विद्यार्थी समाजात महत्त्वाची पदे भूषवित आहेत. परंतु ही शाळा महापालिकेने दहा वर्षांपासून बंद केली आहे. सद्यस्थितीत या शाळेला कचराघराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या शाळेचा वापर कचरागाड्या उभ्या करण्यासाठी होत आहे. एवढेच नव्हे तर एकेकाळी शिक्षणाचे पवित्र मंदिर असलेली ही शाळा दारुड्यांचा अड्डा झाल्याची धक्कादायक माहिती आहे.
झिंगाबाई टाकळी परिसरातील मनपाची शाळा या भागातील एकमेव शासकीय शाळा होती. परंतु महानगरपालिकेने ही शाळा बंद केली. या शाळेत परिसरातील गोरगरिब, मजूर, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षण घेत होती. ही शाळा बंद झाल्यामुळे गरीब मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. सद्यस्थितीत इंग्रजी शाळांची संख्या वाढली आहे. भरमसाट शुल्क देऊन मुलांना शिकविणे गरिबांच्या आवाक्याबाहेरची बाब झाली आहे. परिसरात आजही पैशाअभावी शिक्षण घेऊ न शकणारी अनेक मुले आहेत. परंतु शाळाच बंद झाल्यामुळे नागरिकांचा नाईलाज झाला आहे. बंद झालेल्या मनपाच्या शाळेचीही दुरवस्था झाली आहे. सध्या या शाळेचा कचरागाड्या ठेवण्यासाठी वापर होत आहे. रात्रीच्या वेळी तर शाळेच्या परिसरात असामाजिक तत्त्व, दारुड्यांचा वावर असतो. कचऱ्याचे ढीग शाळेच्या परिसरात राहतात. त्यामुळे या शाळेची रंगरंगोटी, आकर्षक डिझाईन करून शाळेत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करावी, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. मनपाने ही शाळा सुरु केल्यास गरीब मुलांच्या शिक्षणाची सोय होऊन ते शिक्षणाच्या प्रवाहात येणार आहेत.
नागरिकांनी घेतली महापौरांची भेट
मनपाची शाळा पुनर्जीवित करण्यासाठी झिंगाबाई टाकळी परिसरातील नागरिकांनी सरकारी शाळा वाचवा कृती समिती स्थापन करून महापौर संदीप जोशींसोबत चर्चा केली. महापौरांनी आगामी बजेटमध्ये तरतूद करून शाळा सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षणाधिकारी मिश्रीकोचकर यांनीही शाळेत पालकांसोबत चर्चा केली. महापालिकेने या भागात सर्व्हे करून शाळेत न जाणाºया २५ ते ३० मुलांची यादी केली आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा मनपाने सुरु केल्यास पालकांनी या शाळेत मुले टाकण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती कृती समितीचे संयोजक संजय भिलकर, नागेश राऊत, कृष्णा गावंडे, राजन बारई, पापा शिवपेठ, बंडू ठाकरे, राजेंद्र बढिये, संजय सूर्यवंशी, अजय इंगोले, प्रमोद क्षीरसागर, जगदीश गमे यांनी दिली.