नागपुरात कचराकुंड्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:14 PM2019-03-16T23:14:32+5:302019-03-16T23:16:30+5:30
शहर स्वच्छ व सुंदर असावे, स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला प्लास्टिकच्या कचराकुंड्या (डबे) लावल्या. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा, यासाठी दोन कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. काही महिन्यातच या कचराकुंड्यांची अवस्था दयनीय झाली. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या चोरीला गेल्या तर काही ठिकाणी कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात पडून आहेत. यावरील लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. अशा परिस्थितीत नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल कसे येणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर स्वच्छ व सुंदर असावे, स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला प्लास्टिकच्या कचराकुंड्या (डबे) लावल्या. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा, यासाठी दोन कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. काही महिन्यातच या कचराकुंड्यांची अवस्था दयनीय झाली. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या चोरीला गेल्या तर काही ठिकाणी कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात पडून आहेत. यावरील लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. अशा परिस्थितीत नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल कसे येणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
प्रतापनगर भागातील गिट्टीखदान ले-आऊ ट येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गेल्या काही दिवसापासून कचराकुंड्या पडून आहेत. काही कुंड्या कचरा वेचणाºयांनी तोडून भंगारवाल्यांना विकल्याची माहिती आहे. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा यासाठी घरोघरी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन डस्टबिन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय कायद्याच्या चौकटीत अडल्याने त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील काही प्रमुख रस्त्यांच्या कडेला कचराकुंडया लावल्या. परंतु यातील कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या. तक्रार आली तर कचरा उचलला जातो नाही तर कचराकुंड्या कचऱ्याने भरलेल्या राहतात. यामुळे ये-जा करणाऱ्यांना तसेच बाजूला राहणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा त्रास होतो.
केंद्र शासनाच्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात नागपूर शहराचा क्रमांक ५३ वरून ५५ व्या स्थानावर गेला आहे. तो तसा जाण्याला या कुंड्यांचाही थोडाफार हातभार आहे. शहरातील विविध भागात अशा १७०० कचराकुंडया लावण्यात आल्या. मात्र, गेल्या वर्षभरात त्यातील अनेक डबे तुटून पडले आहेत, तर काही चोरीला गेले. शहरातील अनेक भागात घराघरातून कचरा उचलला जात असल्याचा दावा केला जात असला तरी वास्तविकता तशी नाही. आजही अनेकांच्या घरी कचरा उचलायला कुणीच जात नाही. प्रभागातीलच एका भागात कचरा साठवून ठेवला जातो.