बहरलेल्या केळीने सजली परसबाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 01:45 AM2020-10-04T01:45:23+5:302020-10-04T01:48:42+5:30
Gardening केळी म्हटले की आपल्याला चटकन आठवते ते भुसावळ. तिथूनच सर्वत्र केळीची निर्यात होते. नागपूर शहरात केळी फुलवणे म्हणजे काहीसे अवघड अन् नवलाईचेही वाटते. मात्र अजनी, खामला रोडवर फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आराधना ताठे यांनी आपल्या परसबागेत केळी फुलवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केळी म्हटले की आपल्याला चटकन आठवते ते भुसावळ. तिथूनच सर्वत्र केळीची निर्यात होते. नागपूर शहरात केळी फुलवणे म्हणजे काहीसे अवघड अन् नवलाईचेही वाटते. मात्र अजनी, खामला रोडवर फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आराधना ताठे यांनी आपल्या परसबागेत केळी फुलवली. ती झाडे नुसती वाढली नाही तर बहरलीसुद्धा. आता या केळीच्या घडांनी वाकलेले हे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
आराधना ताठे या तशा गृह उद्योजिका पण आम्ही आमच्या आरोग्यासाठी व ग्रामायणशी जुळलेल्या आराधना यांचा केवळ देशी आणि नैसर्गिक वाणाने खाद्यपदार्थ बनविणे हा आग्रह. गर्भवती, स्तनदा माता व त्यांच्या बाळासाठी त्यांचे नैसर्गिक खाद्य उपयोगी म्हणूनही त्यांची ओळख आहे. या नैसर्गिक गोष्टींच्या प्रेमापोटी त्यांना बागकामाचीही आवड निर्माण झाली. त्या फ्लॅटमध्ये राहतात पण गॅलरीत असलेल्या जागेवर त्यांनी बाग फुलवली आहे. प्लॅस्टिकच्या बॅग व कुंड्यांमध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या भाजीपाल्यांची लागवड केली आहे. यात हळद, अदरक, वांगी, टोमॅटो, मिरची, अंबाडी, शेवगा, मायाळू, मटाळू असे सर्व त्यांनी मोठ्या प्रेमाने फुलवले आहे. त्यासाठी स्वत: तयार केलेल्या नैसर्गिक खताचा उपयोग केला. अशाचप्रकारे दोन वर्षापूर्वी आराधना यांनी बिल्डिंगच्या खाली केळीचे रोपण केले होते. त्याचे संगोपन केले. या संगोपनाने ते रुजले आणि फुललेही. वाढलेल्या या केळीच्या झाडावर दर ५-६ महिन्यांनी केळीचा घड लागत असल्याचे त्या सांगतात. आता योगायोगाने दुसरेही झाड बहरले आहे.
फ्लॅटमध्ये राहणाऱ्या अनेकांची गॅलरीत बाग फुलविण्याची इच्छा होते पण जागेअभावी त्यांचा हिरमोड होतो. मात्र या अपुऱ्या व्यवस्थेतही बाग फुलवली जाऊ शकते. छोट्या टोपल्या व टाकाऊ प्लास्टिक कंटेनर्समध्ये नैसर्गिक खताने रोपे फुलतात. यातून बागकामाची आवडही पूर्ण होते आणि आहारात त्यांचा वापरही केला जाऊ शकतो. यातून नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळेल.
आराधना ताठे, गृह उद्योजिका