गाेरेवाडा जंगलात सारे काही आलबेल नाही ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:07 AM2021-06-26T04:07:38+5:302021-06-26T04:07:38+5:30
निशांत वानखेडे नागपूर : शहरातील निसर्ग रमणीय स्थळांना जणू प्रशासनाच्या उदासीनतेचे ग्रहण लागले की काय, अशी स्थिती दिसून येत ...
निशांत वानखेडे
नागपूर : शहरातील निसर्ग रमणीय स्थळांना जणू प्रशासनाच्या उदासीनतेचे ग्रहण लागले की काय, अशी स्थिती दिसून येत आहे. अंबाझरी उद्यानानंतर आता बाळासाहेब ठाकरे गाेरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला वनविभागाने वाऱ्यावर साेडले आहे. जंगलात साेयीसुविधांची पुरती बाेंब असून असलेल्या सुविधांचीही नासाडी हाेत आहे. त्यामुळे दरराेज फिरणाऱ्यांसह पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागताे आहे. सुधारणा करण्यात वन विभागाला रस नसल्याने गाेरेवाड्यात सार काही आलबेल नसून ‘नाव माेठे दर्शन खाेटे’ अशी अवस्था झाली आहे.
२०१३ साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन झाले. येथे उत्कृष्ठ दर्जाच्या साेयीसुविधा निर्माण करण्याची ग्वाही देण्यात आली. त्यानुसार वेळाेवेळी निधीही पुरविण्यात आला पण येथील अवस्था पाहून हा निधी कुठे जिरला, असा प्रश्न येथे फिरणाऱ्यांन पडताे. नुकतेच वर्तमान मुख्यमंत्र्यांनी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय बनविण्याचे सूताेवाच केले पण तरीही सुविधा मिळत नसतील तर काय म्हणावे? प्राण्यांचे अस्तित्व व नैसर्गिक साैंदर्याने नटलेल्या गाेरेवाडा जंगलात फिरण्यासाठी पर्यटकांचा ओढा असताे. पर्यटकांकडून प्रत्येकी ३० रुपये तर नियमित फिरणाऱ्यांकडून वार्षिक १०० रुपये घेतले जातात. मात्र हा पैसा सुविधांसाठी का वापरला जात नाही, असा सवाल नागरिकांना आहे.
पर्यटकांच्या तक्रारीत असुविधांची यादी
- पार्किंग व्यवस्थेचा अभाव : येथे येणाऱ्या पर्यटकांना रस्त्यावर वाहने पार्क करावी लागतात. मकरधाेकडा-काटाेल राज्यमार्ग असल्याने वाहनांची सतत ये-जा असते. अशावेळी दुर्घटना हाेण्याची भीती आहे.
- निसर्ग पायवाट चिखलाची : पायवाटीने सकाळी नियमित फिरणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागताे. यापूर्वी आलेल्या ६३ लाखाच्या निधीतून बाेल्डर व मुरूम टाकल्याचे सांगण्यात आले पण ताे मुरूम कुठे जिरला हा प्रश्न नागरिकांना पडताे.
- कारंज्यावर शेवाळ : तलावाच्या बाजूला तयार करण्यात आलेले कारंजे भग्न झाले असून त्यांच्यावर शेवाळ जमा झाले आहे.
- साेलर पॅनल गायब : रात्री जनावरांचा वावर लक्षात घेता साेलर पॅनल लावले हाेते. काही तुटफूट झाले तर काही गायब झाले. येथील चंदनाची झाडेही कुठे गायब झाली पत्ता नाही.
- पक्षी व प्राण्यांची माहिती देणारे दगडी फलक भग्न झाले व धातूचे फलक तुटून पडले.
लाखाेंच्या सायकली धूळखात
पर्यटक व येथे नियमित फिरणाऱ्यांसाठी सायकल सफारीचा आनंद देण्यासाठी ब्रॅन्डेड कंपनीच्या जवळपास १५ सायकली आणण्यात आल्या हाेत्या. या सायकली धूळखात पडल्या आहेत.
पालकमंत्र्यांना निवेदन
गाेरेवाडा उद्यानात सुविधा निर्माण करण्यासाठी नियमित फिरणाऱ्या ‘गाेरेवाडा जंगल ट्रॅकर्स ग्रुप’च्या सदस्यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन दिले. नगरसेवक हरीश ग्वालबंशी, घनश्याम मांगे, ग्रुपचे अध्यक्ष दीपक तभाने, सचिव अरुण कदम, इंदूभाऊ ठाकूर, दयाराम बावने यांनी हे निवेदन दिले.