‘गॅरीकृपा’ झाली आणि मी ‘लिटल मास्टर’ झालो! ‘स्ट्रेट ड्राइव्ह’मध्ये उलगडला जीवनप्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2023 09:38 PM2023-02-11T21:38:05+5:302023-02-11T21:38:32+5:30
Nagpur News ‘गॅरीकृपा’ असल्यामुळेच झाले आणि मी ‘लिटल मास्टर’ म्हणून आज उभा असल्याचा आनंद सुनील गावस्कर यांनी येथे व्यक्त केला.
नागपूर : मार्च १९७१ मध्ये वेस्ट इंडीजच्या दौऱ्यात सुनील गावस्करांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना बोटातील जखमेमुळे खेळता आला नाही. दुसऱ्या कसोटीत त्यांना पदार्पणाची संधी मिळाली आणि ते १२ धावांवर असताना गॅरी सोबर्स यांनी त्यांचा झेल सोडला. तेव्हा त्यांनी दोन्ही इनिंगमध्ये फिफ्टी मारल्या. तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये चार धावांवर असताना पुन्हा गॅरी सोबर्स यांनी झेल सोडला आणि शंभर धावा जमवल्या. माझी जागा भारतीय संघात पक्की झाली. हे सर्व ‘गॅरीकृपा’ असल्यामुळेच झाले आणि मी ‘लिटल मास्टर’ म्हणून आज उभा असल्याचा आनंद सुनील गावस्कर यांनी येथे व्यक्त केला.
शनिवारी सप्तक आणि छाया दीक्षित वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने पर्सिस्टंटच्या कवी कुलगुरू कालिदास सभागृहात आयोजित ‘स्ट्रेट ड्राइव्ह’मध्ये ते हे भन्नाट किस्से सांगत होते. प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्या प्रश्नांच्या गुगलीवर तेवढ्याच सफाईने सुनील गावस्कर किश्श्यांचे चौकार-षटकार ठोकत होते.
या दौऱ्यात गॅरी सोबर्स यांनी मला क्लब रेस्टेराँमध्ये ‘तू मलाच का कॅच देतो, दुसऱ्याला का देत नाही? आता मला तुझा लट टच हवा आहे’ असे वक्तव्य केले. त्यानंतर चौथ्या टेस्टमध्ये त्यांनी हाय हॅलो करण्याच्या बहाण्याने मला स्पर्श केला आणि त्याच सामन्यात त्यांनी १७८ धावा कुटल्या. पाचव्या सामन्यातही अशाच बहाणा करत त्यांनी मला स्पर्श केला आणि १३२ धावा कुटल्या. अखेरच्या इनिंगमध्ये ते याचसाठी आले. पण, ही बाब अजित वाडेकरांनी हेरली आणि मला बाथरूममध्ये डांबले. ते गेल्यावर मला बाहेर काढले. मैदानावर बघतो तर गॅरी शून्यावर आऊट झाल्याचा स्पर्शयोगायोग भन्नाट शैलीत गावस्कर यांनी यावेळी उलगडून सांगितला. यावेळी त्यांनी लता दीदी, अमिताभ बच्चन, धीरूभाई अंबानी यांच्या नात्यांबद्दल सांगतानाच अनाेळखी चाहत्यांचा आशीर्वाद सर्वोपरी असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी आयोजकांकडून ‘गावस्कर ११’ निवडत प्रत्येकाला गावस्करांच्या स्वाक्षरीचे चेंडू भेट देण्यात आले. डॉ. उदय गुप्ते यांनी संचालन केले; तर मेधा दीक्षित यांनी आभार मानले.