पेट्रोलच्या टँकरचा भडका
By Admin | Published: May 3, 2017 02:26 AM2017-05-03T02:26:45+5:302017-05-03T02:26:45+5:30
बोरखेडी डेपोतून पेट्रोल आणि डिझेल घेऊन जात असलेला टँकर नागपूर-वर्धा मार्गावरील जामठा शिवारात उलटला.
तरुणाचा आगीत होरपळून मृत्यू : जामठा शिवारातील घटना
हिंगणा : बोरखेडी डेपोतून पेट्रोल आणि डिझेल घेऊन जात असलेला टँकर नागपूर-वर्धा मार्गावरील जामठा शिवारात उलटला. टँकरने पेट घ्यायला सुरुवात करताना चालक व क्लिनर दोघेही लगेच केबिनमधून उड्या मारून बाहेर पडले. मात्र, केबिनमध्ये असलेल्या अन्य एकास बाहेर पडणे शक्य न झाल्याने त्याला आत होरपळून मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामठा शिवारात मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
वासुदेव भोजराज कापगते (२६, रा. सोनोली, जिल्हा भंडारा) असे मृताचे नाव असून, तो भंडारा जिल्हह्यातील आमडी येथील एका पेट्रोलपंपवर नोकरी करायचा. चालक संतोष मारबते (३५, रा. तुमसर, जिल्हा भंडारा) व क्लिनर विक्की सुनील धुर्वे (२२, रा. तुमसर, जिल्हा भंडारा) या दोघांनी त्यांच्या टँकरमध्ये बोरखेडी येथील डेपोतून १० हजार लिटर पेट्रोल आणि आणि १० हजार लिटर डिझेल घेतले आणि नागपूर मार्गे भंडाऱ्याकडे जायला निघाला. या दोघांसोबत भोजराजही टँकरच्या केबिनमध्ये होता. ते टँकर घेऊन जामठा शिवारात पोहोचताच चालकाचा ताबा सुटला आणि टँकर उलटला.
काही क्षणात टँकरने पेट घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे चालक संतोष आणि क्लिनर विक्की लगेच केबिनचे दार उघडून उडी मारून बाहेर पडले. वासुदेवला मात्र बाहेर पडणे शक्य न झाल्याने तो आत अडकून पडला. माहिती मिळताच हिंगणा पोलीस तसेच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले.
आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दलाचे दुसरे वाहन बोलावण्यात आले. सुरुवातीला टँकरच्या केबिनचा भागावर पाण्याचा मारा करण्यात आला. अंदाजे दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर टँकरची आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. त्यानंतर वासुदेवला शोधण्यात आले. टँकरच्या केबिनमध्ये वासुदेवच्या मृतदेहाचा कोळसा तेवढा शिल्लक होता. या अपघातामुळे नागपूर - वर्धा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आग नियंत्रणात आल्यानंतर ठाणेदार हेमंत खराबे यांनी वाहतूक सुरळीत केली. (तालुका प्रतिनिधी)
चालक व क्लिनर जखमी
उलटलेल्या टँकरने पेट घेताच सावधगिरी बाळगत टँकरचालक संतोष मारबते आणि क्लिनर विक्की धुर्वे यांनी टँकरच्या केबिनमधून उडी मारली. या धावपळीत संतोषचा चेहरा व हात भाजला असून, त्याच्या पायालाही दुखापत झाली. शिवाय, विक्कीच्या खांद्याला मार लागला. या दोघांनाही लगेच जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे दोघांवर प्रथमोपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले. या दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
नागपूर - वर्धा मार्ग ‘जाम’
पेट्रोल-डिझेलचा टँकर रोडच्या कडेला उलटताच टँकरने पेट घेतला. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत असल्याने नागपूर - वर्धा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. हा मार्ग वर्धा - यवतमाळ आणि चंद्रपूर-हैदराबादकडे जात असल्याने या मार्गावर वाहनांची २४ तास वर्दळ असते. त्यातच अपघातामुळे वाहने मध्येच अडकून पडल्याने रखरखत्या उन्हात प्रवाशांचेही हाल झाले. आग नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.