नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात गॅस्ट्रोची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:20 PM2018-07-23T23:20:43+5:302018-07-23T23:23:17+5:30
भिवापूर शहरासह तालुक्यातील नऊ गावांमधील एकूण २२ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून, त्यांच्यावर भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्येकाची प्रकृती धोक्याबाहेर असून, काहींना सुटीदेखील देण्यात आली. एकाला मात्र उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. भिवापूर शहरातील काही भागासह नऊ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने तिथे गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भिवापूर शहरासह तालुक्यातील नऊ गावांमधील एकूण २२ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून, त्यांच्यावर भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्येकाची प्रकृती धोक्याबाहेर असून, काहींना सुटीदेखील देण्यात आली. एकाला मात्र उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. भिवापूर शहरातील काही भागासह नऊ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने तिथे गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.
गॅस्ट्रोची लागण झालेल्या गावांमध्ये भिवापूर शहरातील धर्मापूर व तास या भागासह तालुक्यातील भागेबोरी, किन्हाळा, साठगाव, जवराबोडी, वडध, नक्षी, भुयार, किन्ही (खुर्द) व गाडेघाट या गावांचा समावेश आहे. नीलिमा गोपाल चौधरी (१७) व करण राजेंद्र चौधरी (१२) दोघेही रा. भागेबोरी, सानिया कमलाकर गजभिये (१२, रा. कोलारी), शुभम दामोधर फुलझेले (१९), तुळसाबाई रामचंद्र पिल्लेवान (७०) व हरिभाऊ तुकाराम पाचभाई (६५) तिघेही रा. भिवापूर, आर्यन खुशाब नागोसे (१०) व निशा अरुण नारनवरे (२५) दोघेही रा. तास (भिवापूर), अंजली घनश्याम गोवर्धन (८) व शांता प्रल्हाद धनविजय (७०) दोघेही रा. धर्मापूर (भिवापूर), सुषमा राजू कुरूटकर (२८, रा. किन्हाळा), अभय रमेश भुसारी (३३, रा. साठगाव), माला अंबादास वानखेडे (४५, रा. किन्ही), रुचिता छबिलाल वानखेडे (१६, रा. किन्ही खुर्द), राजेंद्र कोठीराम मेश्राम (३५), आशू अमृत वैद्य (१२), अमित खुशम पडोळे (२०) व सायली अमृत वैद्य (१५) सर्व रा. जवराबोडी, लीलाबाई चंद्रभान वराडे (६५, रा. वडध), धर्माबाई राजेंद्र कावळे (८४, रा. भुयार), रोहीत विलास दहीवले (१२, रा. नक्षी) आणि कपिल गेडाम (२५, रा. गाडेघाट) यांच्यावर भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, यातील काहींना सुटीही देण्यात आली. हरिभाऊ पाचभाई यांना मात्र नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे.
या गावांमध्ये मंगळवार (दि. १७) पासून गॅस्ट्रोची लागण झाली असून, तेव्हापासूनच भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात गॅस्ट्रोचे रुग्ण दाखल व्हायला सुरुवात झाली. तास, मोखाळा व जवराबोडी या तीन गावांसाठी पेयजल योजनेंतर्गत एकमेव पाणीपुरवठा योजना असून, ती सध्या निर्माणाधीन आहे. त्या योजनेसाठी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लगतचे घाण व दूषित पाणी नळाला येत असल्याचा आरोप जवराबोडी येथील नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, अन्य गावांमधील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत किंवा पाण्याच्या टाकीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकले जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
ग्रामीण रुग्णालय ‘आॅक्सिजन’वर
तालुक्यात गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या सध्या वाढत आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमधील रुग्ण उपचारासाठी भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात येत असून, सध्या या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे संपूर्ण रुग्णांचा भार एका परिचारिकेला सहन करावा लागत असून, सध्या त्यांना २४ तास कर्तव्य बजावावे लागत आहे. त्यांनाही सोमवारी दुपारी अस्वस्थ वाटत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.