नागपूर जिल्ह्यातील केळवदमध्ये गॅस्ट्रोचा प्रकोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:29 PM2018-04-11T12:29:49+5:302018-04-11T12:30:00+5:30
केळवदमधील तब्बल २० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली. पहलेपार भागातील हे नागरिक असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून, रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने डॉक्टरांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केळवदमधील तब्बल २० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली. पहलेपार भागातील हे नागरिक असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून, रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने डॉक्टरांनी सांगितले. दूषित पाणी प्यायल्याने नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
केळवदला नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, ही नळयोजना ग्रामपंचायत प्रशासनाच्या अखत्यारीत आहे. नळयोजनेच्या विहिरीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने तसेच पर्यायी व्यवस्था नसल्याने गावाला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. तोही पुरेसा नसतो. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी गावातील सार्वजनिक व खासगी विहिरींचे तसेच हॅण्डपंपचे पाणी वापरावे लागते. ते पिण्यायोग्य आहे की नाही, हे तपासण्याची व त्याबाबतची माहिती नागरिकांना सांगण्याची तसदी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली नाही. परिणामी, गावातील पहलेपार भागात राहणाऱ्या नागरिकांना मागील तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची लागण व्हायला सुरुवात झाली. सहा रुग्णांची स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली असून, त्यांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या सर्वांवर वेळीच औषधोपचार करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा पांडे यांनी दिली.
गावात गॅस्ट्रोचे यापेक्षा अधिक रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण गरीब नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असून, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ते केळवद व सावनेर येथील खासगी डॉक्टरांकडे उपचाराला जातात. त्यामुळे गावात नेमक्या किती नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली, हे कळू शकले नाही. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही ठोस उपाययोजना करायला सुरुवात केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
पाण्याच्या ‘क्लोरिनेशन’कडे दुर्लक्ष
गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिक गावातील तसेच परिसरातील सार्वजनिक व खासगी विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला आहे. मात्र, प्रशासनाने या विहिरींमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ टाकण्याची तसदी घेतली नाही. मग, या जलस्रोतातील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे, त्या जलस्रोतातील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, हे तपासणे, पिण्यायोग्य नसल्यास तिथे सूचना फलक लावून नागरिकांना माहिती देणे यासह अन्य महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष केले. दुसरीकडे, गावातील विहिरींच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, विहिरींमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ टाकणे सुरू असल्याची माहिती ग्रामसेवक बांबल यांनी दिली. वास्तवात, ही प्रक्रिया गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर सुरू करण्यात आली आहे. काही विहिरींमध्ये अद्यापही ‘ब्लिचिंग पावडर’ टाकली नाही, असे नागरिकांनी सांगितले.
ग्रामपंचायतला लेखी सूचना
गॅस्ट्रो दूषित पाण्यामुळे होतो. नळयोजनेसह गावातील सार्वजनिक व खासगी विहिरींमध्ये ‘ब्लिचिंग पावडर’ टाकण्याची लेखी सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला पूर्वीच दिली होती. काही शेतातील विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नागरिकांनी कुठल्याही विहिरीचे अथवा हॅण्डपंपचे पाणी पिणे टाळावे. नागरिकांनी ‘ब्लिचिंग पावडर’ टाकलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. प्रसंगी उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
- डॉ. निशा पांडे,
वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, केळवद..