'गटार' हे वाड्मयीन ताकत सिद्ध करणारे नाटक - डॉ. भालचंद्र जोशी
By आनंद डेकाटे | Published: August 30, 2023 04:27 PM2023-08-30T16:27:07+5:302023-08-30T16:28:15+5:30
वीरेंद्र गणवीर लिखीत गटार' या पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर : नागपुरातील १९७७-७८ च्या काळातील आमच्या समांतर कला चळवळीतील स्ट्रीट प्ले रंगभूमीच्या आशयाचे सामाजिक बांधिलकीचे आणि व्यवस्था परिवर्तनाचे सूत्र दलित रंगभूमी बरोबर आम्ही प्रभावीपणे प्रवाहित राखले. आता वीरेंद्र गणवीर यांच्या बहुजन रंगभूमीने केलेला त्याचा विस्तार व विकास हे विदर्भाचे नाट्य वैभव आणि वैदर्भीय समांतर रंगभूमी बरोबरच महाराष्ट्राच्या रंगभुमीचे ते वैशिष्ट्य आहे, असे उद्गार डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी येथे काढले.
'गटार' या वीरेंद्र गणवीर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सायंटिफिक सभागृहात अगोदर 'गटार' या बहुपुरस्कृत नाटकाचा ७५ वा प्रयोग आणि नंतर त्या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. विचारपीठावर ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे, प्रख्यात हिंदी लेखक,समीक्षक डॉ. विमल थोरात, प्रगतिशील लेखक संघाचे प्रसेनजित तेलंग, बोधी प्रकाशनच्या संचालक अर्चना खोब्रागडे व लेखक वीरेंद्र गणवीर होते.
डॉ. विमल थोरात म्हणाल्या, विषमतेतून निर्माण जातिव्यवस्थेने विशिष्टच जातीवर लादलेले घाण उपसण्याचे काम हे त्यांना मानवाधिकारांपासून वंचित राखते, ती व्यवस्था उलथवून टाकण्याचे आवाहन ही नाट्यकृती प्रभावीपणे करते.
डॉ. रविंद्र शोभणे म्हणाले, लोकभावनांचा अवमान हा एक नवा प्रवाह पुढे आला असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपी वर सर्व लोक आपआपल्या तऱ्हेने नको ते विश्लेषण मांडताहेत. प्रास्ताविक स्वतः लेखक, दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर यांनी केले. संचालन शांतरक्षित गावंडे यांनी तर अस्मिता पाटिल यांनी आभार मानले.