कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट गेले चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:19+5:302021-06-04T04:08:19+5:30
उमरेड : वेकोलि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे परिसरातील उमरेड, कावरापेठ, गांगापूर, हातकवडा, ठोंबरा येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांना दरवर्षी कमालीचे नुकसान सोसावे लागत ...
उमरेड : वेकोलि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे परिसरातील उमरेड, कावरापेठ, गांगापूर, हातकवडा, ठोंबरा येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांना दरवर्षी कमालीचे नुकसान सोसावे लागत आहे. याच आम नदीच्या पात्रात ठोंबरा रस्त्यालगत पुरातन काळातील कोल्हापुरी बंधारा अजूनही कसाबसा शाबूत आहे. चार-पाच वर्षांपूर्वी चोरट्यांनी बंधाऱ्याचे लोखंडी गेट पळविले. चोरट्यांनी हातसफाई केल्यानंतरही जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाला जाग आली नाही. या बंधाऱ्याची अद्याप दुरुस्तीही झाली नाही. एकीकडे आम नदीच्या प्रवाहाला बाधा उत्पन्न करण्याचे काम वेकोलिने केले. त्यानंतर बंधाऱ्याचे गेटच चोरीला गेले. यामुळे वेकोलिने दिलेल्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम लघु सिंचन विभागाने केल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.
१९७०-७२ च्या काळात ठोंबरा मार्गालगतचा कोल्हापुरी बंधारा जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आला होता. १२ ते १५ लोखंडी गेट या बंधाऱ्याला होते. यामुळे आम नदीच्या किनारी असलेल्या असंख्य शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा लाभ होत असे. त्यानंतर कोळसा खाणीतून निघालेला गाळ, तेलमिश्रित रसायन आणि काटेरी झाडेझुडपांमुळे आम नदीचा प्रवाह थांबला. अशातच बंधाऱ्याचे लोखंडी गेटच चोरट्यांनी लांबविले. या परिसरातसुद्धा केरकचरा आणि बंधाऱ्याला झुडपांचा वेढा दिसून आला. मागील अनेक वर्षांपासूनची ही समस्या लघु सिंचन विभागाने सोडविली नाही. यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. खरीप हंगाम काही दिवसावर येऊन ठेपला आहे. अशावेळी वेकोलिने तातडीने दखल घेऊन आम नदीपात्राचे खोलीकरण करावे. शिवाय ठोंबरा रस्त्यानजीक असलेला कोल्हापुरी बंधारा नव्याने उभारण्यात यावा, अशी मागणी धीरज गिरडकर, दामोदर बानकर, सोपान गिरडकर, राघोजी गिरडकर, मनोज गिरडकर, ज्ञानेश्वर गिरडकर आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.
अंदाजपत्रक पाठविले
कोल्हापुरी बंधाऱ्याच्या अवस्थेबाबत जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाचे शाखा अभियंता विष्णू लांडे यांच्याशी चर्चा केली असता, सदर बंधाऱ्याबाबतचे अंदाजपत्रक नागपूर कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एकूण ३० लाख ४२ हजार ६०० रुपयांच्या अंदाजपत्रकाला तातडीने मान्यता प्रदान करावी. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून सदर कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
--