कळमेश्वरात गती शक्ती कार्गो टर्मिनल कार्यान्वित, गुरुवारी रिकामी झाली पहिली खेप
By नरेश डोंगरे | Published: May 10, 2024 07:46 PM2024-05-10T19:46:42+5:302024-05-10T19:46:50+5:30
स्टीलच्या अवजड उत्पादनांची होणार लोडिंग, अनलोडिंग
नागपूर: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील दुसरा गती शक्ती कार्गो टर्मिनल कळमेश्वरला कार्यान्वित करण्यात आला आहे. एका खासगी कंपनीकडे या टर्मिनलच्या संचालनाचे काम राहणार असून, कंपनीच्या मुंबईतील प्रकल्पातून अवजड उत्पादनाची पहिली खेप कळमेश्वरच्या टर्मिनलवर गुरुवारी, ९ मे रोजी पोहचली.
नागपूर विभागातील पोलाद उद्योगाला या टर्मिनलचा मोठा फायदा होणार आहे. कारण कॉईल तसेच स्टीलच्या अवजड वजनाच्या उत्पादनांची रस्त्याने वाहतूक करताना वेगवेगळ्या अडथळ्यांना पार करावे लागते. रहदारीच्या भागातील वाहतूकीलाही अडसर निर्माण होतो. रेल्वे मार्गाने मात्र सहज आणि सुरळीत वाहतूक केली जाते. त्यामुळे लॉजिस्टिक ऑपरेशन्सची कार्यक्षमता वाढण्यासही मदत होते.
सर्व प्रकारच्या तांत्रिक चाचण्या पार पाडल्यानंतर १ मे २०२४ रोजी हा टर्मिनल सज्ज झाल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई प्लांटमधून अवजड स्टील उत्पादने घेऊन ५८ वॅगनची पहिली खेप ९ मे रोजी या टर्मिनलवर दाखल झाली. प्रगत तंत्रज्ञानाचा अविष्कार असलेली ४० मेट्रीक टन ईलेक्ट्रीक गेलियाथ क्रेन तसेच अन्य प्रगत मशिनरीसह जलदगतीने लोडिंग अनलोडिंगची यंत्रणा या टर्मिनलवर आहे. त्यामुळे अवघ्या ३.५ तासांत पहिली रेक (खेप) रिकामी करण्यात आली.
या गती शक्ती कार्गो टर्मिनलमध्ये दरमहा पाच ते सहा रेक हाताळली जाण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक रेकमधून अंदाजे ५० लाखांची कमाई होऊ शकते. अर्थात किमान तीन - साडेतीन कोटी रुपयांचे उत्पन्न या टर्मिनलमधून मध्य रेल्वेच्या तिजोरीत जमा होऊ शकते, असा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे.