गौरव ‘शौर्य’ देऊन गेला
By Admin | Published: January 19, 2016 03:53 AM2016-01-19T03:53:21+5:302016-01-19T03:53:21+5:30
दीड वर्षांपूर्वी आपल्या प्राणांची आहुती देऊन अंबाझरी तलावात बुडत असलेल्या चौघा जिवलग मित्रांना वाचविणाऱ्या
नागपूर : दीड वर्षांपूर्वी आपल्या प्राणांची आहुती देऊन अंबाझरी तलावात बुडत असलेल्या चौघा जिवलग मित्रांना वाचविणाऱ्या गौरव कवडूजी सहस्रबुद्धे या विद्यार्थ्याच्या आठवणी सोमवारी पुन्हा जाग्या झाल्या. गौरवची राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यातही गौरवच्या शौर्याची विशेष दखल घेत शौर्य पुरस्कारामध्ये सर्वोच्च असलेल्या भारत पुरस्काराचा मानही त्याला मिळाला आहे.
भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिद्धार्थ यांनी सोमवारी केलेल्या बाल शौर्य पुरस्काराच्या घोषणेने प्रत्येक नागपूरकरासाठी गर्वाने मान उंचाविली. यावर्षी देशभरातील २५ बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, त्यामध्ये गौरव सहस्रबुद्धेचाही समावेश आहे. ही बातमी जेव्हा गौरव राहत असलेल्या टाकळी सीम परिसरात पसरली तेव्हा वस्तीतील नागरिकही शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचत आहेत. अर्थातच या सर्वांच्या मनात एक खंत कायम आहे, चार कु टुंबाला आनंदाचा क्षण देणारा गौरव पुरस्काराचा आनंद साजरा करण्यासाठी आता आपल्यात नाही. ३ जून २०१४ रोजी घडलेली ही घटना. १० वीची परीक्षा नुकतीच संपली होती. अंबाझरी तलावाजवळ खेळत असताना आपले चार मित्र बुडत असल्याचे त्याने पाहिले. प्राणाची पर्वा न करता त्याने पाण्यात उडी घेतली आणि एकेक करीत तीन मित्रांना पाण्याबाहेर काढले. एवढ्यात तो थकला होता. मात्र तरीही चौथ्या मित्राला काढण्यासाठी तो सरसावला आणि त्याने चौथ्याला किनाऱ्यावर काढलेही. मात्र तोपर्यंत पूर्णपणे गतप्राण झालेला गौरव स्वत: मात्र पाण्याबाहेर येऊच शकला नाही. गौरवची आई आणि वडील हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. २४ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरवची आई रेखा सहस्रबुद्धे हा पुरस्कार स्वीकारतील.
आठवणीने शेजारीही गहिवरले
शेजारी राहणारे मनोज सिरिया यांना गौरव काका म्हणायचा. गौरवला शौर्य पुरस्क ार मिळावा म्हणून त्यांनीही प्रयत्न केले. शासनाच्या बालकल्याण विभागाकडून आलेला फोन त्यांनाच मिळाला होता. गौरवचे शौर्य अतुलनीय असेच असल्याचे मनोज सिरिया म्हणाले. आज जेव्हा त्याला पुरस्कार मिळाला तेव्हा त्याची कमतरता नक्कीच भासत आहे. तो पोहण्यात हुशार होता आणि त्याने या गुणाचे चीजही केले. त्याचा आम्हाला गर्व आहे. मात्र तो आज जिवंत असायला हवा होता, अशी भावना सिरिया यांनी व्यक्त केली.