पळून जाण्यात गौस टोळी सराईत
By admin | Published: April 1, 2015 02:31 AM2015-04-01T02:31:02+5:302015-04-01T02:31:02+5:30
पोलिसांवर गोळीबार करून जगनाडे चौकातून पळून जाणाऱ्या कुख्यात सत्येंद्र गुप्ताने आता कारागृहातून पळ काढून शहर पोलिसांना दुसऱ्यांदा आव्हान दिले आहे.
नागपूर : पोलिसांवर गोळीबार करून जगनाडे चौकातून पळून जाणाऱ्या कुख्यात सत्येंद्र गुप्ताने आता कारागृहातून पळ काढून शहर पोलिसांना दुसऱ्यांदा आव्हान दिले आहे. कुख्यात राजा गौसचा राईट हॅण्ड मानला जाणाऱ्या गुप्ताला पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याचा अनुभव आहे.
१७ एप्रिलच्या सायंकाळी उंटखाना परिसरात गौस आणि गुप्ताने एका तरुणीची छेड काढली. तिच्या मित्राने हटकले म्हणून त्याच्यावर गोळी झाडून त्याची हत्या केली. यानंतर मध्यरात्री त्यांनी जगनाडे चौकात पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी त्यांची बरीच शोधाशोध केली मात्र, ते शहरात सापडलेच नाही. बरेच दिवसानंतर गौसला उत्तर प्रदेशात तर गुप्ताला मध्य प्रदेशात गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली. या दोघांच्या चौकशीतून बिशनसिंग उकेचे नाव पुढे आले. तो जबलपूरचा रहिवासी आहे. गुन्हे केल्यानंतर राजा गौस साथीदारांसह तिकडे पळून जायचा तेव्हा बिशनसिंग त्यांना आश्रय द्यायचा. नंतर तो राजासोबत नागपुरात येऊनही गुन्हे करू लागला. त्यामुळेच राजा गौस, गुप्ता सोबत पोलिसांनी बिशनसिंगवरही मोका लावला होता. कारागृहात राजा गौसने आपली टोळी वाढवली. शिबू, गोलू, नेपालीसोबतच अनेक गुन्हेगारांना टोळीत सहभागी केले.
त्यांना तो कारागृहात सुविधा पुरविण्यासाठी खर्चही करीत होता. यामुळेच चोरटा गोलू आणि कुणीच नातेवाईक आसपास नसलेला नेपाली चक्क कारागृहातून पळून जाण्याचा निर्ढावलेपणा दाखवू शकला. यापूर्वी गोळीबार करून आणि आता पळून जाऊन गौस टोळीतील गुन्हेगारांनी शहर पोलिसांना आव्हान दिले आहे. (प्रतिनिधी)